मुंबई प्रतिनिधी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असताना आता हवामान विभागाने दिलासादायक अंदाज वर्तवला आहे. पुढील काही दिवस राज्यातील विविध भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, वातावरणातील बदलांमुळे राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो.
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या भागांत विजांचा कडकडाट आणि ताशी ५० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
३ जूनसाठी येलो अलर्ट
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
४ जूनसाठी येलो अलर्ट
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, कोल्हापूर, सातारा, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यातील बहुतांश भागांत तापमानात वाढ झाल्याने उष्णतेचा त्रास जाणवत होता. मात्र, आगामी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामानातील बदल लक्षात घेता नागरिकांनी अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


