संभाजीनगर प्रतिनिधी
महायुतीतील जागावाटपानंतर छत्रपती संभाजीनगरच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून माजी मंत्री व शिंदेसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपवर थेट आणि अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. विधानपरिषदेची जागा भाजपकडे गेल्यानंतर सत्तार यांनी व्यक्त केलेली नाराजी आता उघड राजकीय संघर्षाचे संकेत देऊ लागली आहे.
भाजपने या मतदारसंघासाठी सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली असून ते महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. मात्र, या निर्णयानंतर सत्तार यांनी मुलगा समीर सत्तार यांच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणांमध्ये नवी गुंतागुंत निर्माण झाली आहे.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सत्तार यांनी स्थानिक पातळीवरील राजकारणावर थेट भाष्य करताना म्हटले की, “पहिले ग्रामपंचायत, मग जिल्हा परिषद आणि नंतर महापालिका – आमचे राजकीय अस्तित्वच कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.” संभाजीनगर हा आमचा पारंपरिक राजकीय गड असल्याची भावना व्यक्त करत त्यांनी आपली नाराजी स्पष्ट केली.
याचवेळी त्यांनी अधिक गंभीर इशारा देत सांगितले की, त्यांच्या नेतृत्वापर्यंत सर्व माहिती पोहोचली नाही तर महाराष्ट्रातही पश्चिम बंगालसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या विधानामुळे महायुतीतील अंतर्गत तणाव आणखी उघड झाला आहे.
सत्तार यांनी भाजपवर केलेला सर्वाधिक तीव्र हल्ला म्हणजे – “भाजप हे स्लो पॉयझन आहे.” सत्तेत असूनही शिवसेनेला मागे ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी म्हटले की, “आमचा एक एक गड संपवला जातोय आणि आम्हालाच बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला जातोय.”
गुवाहाटीतील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत सत्तार म्हणाले की, “आमचा त्याग कामाख्या देवीला माहिती आहे, पण भाजप तो विसरली आहे.” भाजपकडून शिवसेनेत गटतट निर्माण केले जात असल्याचा आरोप करत त्यांनी “हातपाय आधी तोडले, आता मुंडकं उडवण्याचा प्रयत्न सुरू आहे,” अशा शब्दांत संताप व्यक्त केला.
महायुतीतील या वादाचा परिणाम आगामी विधानपरिषद निवडणुकीत आणि स्थानिक राजकारणात कितपत उमटतो, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


