कल्याण प्रतिनिधी
लग्नाचे आमिष दाखवून फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत असतानाच कल्याणमध्ये एका व्यावसायिकाला तब्बल ३५ लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इन्शुरन्स पॉलिसीच्या माध्यमातून ओळख वाढवत आधी विश्वास संपादन करण्यात आला आणि त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत लाखो रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांना अटक केली असून महात्मा फुले पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम परिसरातील एका नामांकित दुकानाच्या मालकाची ओळख जयश्री पाटील हिने मुंबईत वास्तव्यास असलेल्या रोमा परदेशी हिच्याशी करून दिली होती. रोमा एका मोठ्या इन्शुरन्स कंपनीत कार्यरत असल्याचे सांगत तिने संबंधित व्यावसायिकाशी संपर्क वाढवला. सुरुवातीला इन्शुरन्स पॉलिसी काढून देण्याच्या नावाखाली आर्थिक व्यवहार सुरू करण्यात आले.
विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी आरोपी महिलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व्यावसायिकाशी जवळीक वाढवल्याचे तपासात समोर आले आहे. इन्शुरन्स पॉलिसीच्या नावाखाली रोमा परदेशी हिने व्यावसायिकाकडून लाखो रुपये घेतले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही पॉलिसी सुरू करण्यात आली नसल्याचे नंतर स्पष्ट झाले. त्यानंतर काही दिवसांनी जयश्री पाटील हिने मध्यस्थी करत रोमा परदेशी ही संबंधित व्यावसायिकाशी विवाह करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
लग्नासाठी होकार दिल्यानंतर दोन्ही महिलांनी विविध कारणे पुढे करत वेळोवेळी पैशांची मागणी सुरू केली. कधी वैद्यकीय कारण, कधी घरगुती अडचण तर कधी व्यवसायातील गरज सांगत आरोपींनी मोठ्या प्रमाणावर रक्कम उकळल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विश्वासाच्या नात्याचा गैरफायदा घेत आरोपींनी संबंधित व्यावसायिकाकडून तब्बल ३५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, सतत पैसे देऊनही लग्नाबाबत ठोस हालचाल होत नसल्याने व्यावसायिकाला संशय आला. चौकशी केल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत तपास सुरू केला.
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी रोमा परदेशी हिला अटक केली होती. तिच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी जयश्री पाटील हिचा शोध सुरू केला. अखेर तिला कोल्हापूर येथून अटक करण्यात आली असून पुढील चौकशीसाठी तिला कल्याणमध्ये आणण्यात येत आहे.
फसवणुकीचा बळी ठरलेल्या व्यावसायिकाने आरोपींकडून आपली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली आहे. “लग्नाचे आमिष दाखवत माझा विश्वासघात करण्यात आला. पोलिसांनी आरोपींकडून पैसे वसूल करून मला न्याय मिळवून द्यावा,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या संपूर्ण प्रकरणामुळे लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या आर्थिक फसवणुकीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियातून किंवा ओळखीच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या संबंधांमध्ये आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.


