कल्याण प्रतिनिधी
पहाटे चार वाजता उठून वर्तमानपत्रांचे गठ्ठे खांद्यावर वाहत घराघरांत पेपर पोहोचवणाऱ्या वडिलांच्या कष्टांना अखेर सुवर्णफळ लाभले आहे. कल्याणमधील ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते शैलेंद्र उर्फ राजू क्षीरसागर यांच्या कन्या लतिका क्षीरसागर यांनी देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट – सी.ए.) परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळवत आपल्या कुटुंबाचा, कल्याण शहराचा आणि संपूर्ण वृत्तपत्र विक्रेता समाजाचा मान उंचावला आहे.
लतिकाच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून विविध सामाजिक संस्था, नागरिक, व्यापारी, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणून लतिका क्षीरसागर यांच्याकडे पाहिले जात आहे.
४५ वर्षांची अखंड सेवा; कष्टांच्या पैशातून मुलांना घडवले
शैलेंद्र उर्फ राजू क्षीरसागर हे गेली तब्बल ४५ वर्षे कल्याणमधील सहजानंद चौक परिसरात वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करत आहेत. दररोज पहाटे चार वाजता उठून कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वितरण केंद्रातून वर्तमानपत्रांचे बंडल आणणे, स्टॉलवर विक्री करणे आणि शेकडो घरांमध्ये वर्तमानपत्र पोहोचविणे, अशी त्यांची दैनंदिन दिनचर्या आहे.
या संपूर्ण प्रवासात त्यांना पत्नी श्वेता क्षीरसागर, मोठा मुलगा आणि कन्या लतिका यांची मोलाची साथ लाभली. उन्हाळा, पावसाळा किंवा कडाक्याची थंडी… कोणत्याही परिस्थितीत कामात खंड पडू दिला नाही. याच कष्टाच्या पैशातून त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले.
लतिकाचा प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास
लतिका क्षीरसागर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कल्याणमधील होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथून बी.कॉम. आणि एम.कॉम. पदव्या संपादन केल्या.
बारावीपासूनच त्यांनी सी.ए. अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली. फाउंडेशन, इंटरमिजिएट, आर्टिकलशिप आणि अंतिम परीक्षा हे सर्व टप्पे त्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर यशस्वीरीत्या पूर्ण केले. विशेष म्हणजे, देशातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.
“आई-बाबाच माझे खरे गुरू”
आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय लतिका आई-वडील आणि मोठ्या भावाला देतात.
“आई-वडिलांनी आयुष्यभर कष्ट करून आम्हाला शिकवले. त्यांनी कधीच आमच्यावर आर्थिक अडचणींचे ओझे पडू दिले नाही. मोठ्या भावानेही प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले. माझे आई-बाबाच माझे खरे गुरू आणि प्रेरणास्थान आहेत,” असे भावनिक शब्दांत लतिका सांगतात.
चाळीतले वास्तव, पण स्वप्ने मात्र मोठी
क्षीरसागर कुटुंबाचे वास्तव दोन खोल्यांच्या साध्या चाळीत होते. मर्यादित जागा, आर्थिक अडचणी आणि साधी राहणी असूनही दोन्ही मुलांनी परिस्थितीची कधीच तक्रार केली नाही. उपलब्ध साधनांमध्येच अभ्यास करत त्यांनी आपले ध्येय निश्चित ठेवले.
“आम्ही फक्त मुलांना आधार दिला. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने यश मिळवले. आज मुलीने सी.ए. होऊन आमचे आयुष्य सार्थकी लावले,” असे समाधान व्यक्त करताना राजू क्षीरसागर यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.
स्वतःही बसली पेपर स्टॉलवर
लतिका सांगतात की, शिक्षण घेत असतानाही त्या अनेकदा वडिलांच्या पेपर स्टॉलवर बसून वर्तमानपत्र विकत असत.
“आई, बाबा आणि भाऊ घरपोच वर्तमानपत्र टाकायला गेले की मी स्टॉल सांभाळत असे. एक-दोन रुपयांचे वर्तमानपत्र विकताना त्या प्रत्येक रुपयामागचा घाम आणि कष्ट जवळून पाहिले आहेत. त्या पैशातूनच आमचे शिक्षण सुरू आहे, याची जाणीव कायम होती. त्यामुळे अभ्यास करताना अधिक जबाबदारीची भावना निर्माण झाली,” असे त्या सांगतात.
आजही मोठा भाऊ बँकेत नोकरी करत असला तरी वेळ मिळेल तेव्हा वडिलांना मदत करतो. लतिकाही आपल्या कामातून वेळ काढून पेपर व्यवसायात हातभार लावतात.
विदेशात उच्च शिक्षणाचे स्वप्न
सी.ए. झाल्यानंतर आता लतिका पुढील वाटचालीची तयारी करत आहेत. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असून त्यासाठी प्रथम व्यावसायिक अनुभव आणि आर्थिक स्थैर्य मिळवण्यावर त्या भर देणार आहेत.
“सध्या नोकरीला प्राधान्य देणार आहे. अनुभव आणि आर्थिक तयारी झाल्यानंतर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याचा मानस आहे,” असे लतिका यांनी सांगितले.
जिद्द, कष्ट आणि संस्कारांचा प्रेरणादायी आदर्श
वृत्तपत्र विक्रेत्याच्या घरातून सी.ए. होण्यापर्यंतचा लतिका क्षीरसागर यांचा प्रवास हा केवळ वैयक्तिक यश नाही, तर कष्ट, जिद्द, चिकाटी आणि पालकांच्या त्यागाचा प्रेरणादायी आदर्श आहे. आर्थिक परिस्थिती कधीही यशाच्या आड येत नाही; प्रामाणिक मेहनत, योग्य मार्गदर्शन आणि शिक्षणावरील निष्ठा असेल तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, हे लतिका यांनी आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या या यशाने संपूर्ण कल्याण शहरासह वृत्तपत्र विक्रेता समाजाचा अभिमान उंचावला आहे.


