कल्याण प्रतिनिधी
कल्याण पश्चिमेतील चार पदरी उड्डाणपुलाच्या कामादरम्यान बुद्धभूमी परिसरात झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ बुद्धभूमी फाउंडेशन, बौद्ध समाज आणि भिकू संघाच्या वतीने सोमवारी कल्याण-डोंबिवली महापालिका (केडीएमसी) मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान प्रस्तावित चार पदरी पुलाच्या कामासाठी वालधुनी परिसरातील अडथळे हटविण्याची कारवाई महापालिकेकडून करण्यात आली होती. मात्र, या कारवाईदरम्यान प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनने केला आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व नुकसानभरपाईच्या मागणीसाठी फाउंडेशनच्या वतीने गेल्या १५ दिवसांपासून केडीएमसी मुख्यालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू आहे.
मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत सोमवारी या आंदोलनाचे रूपांतर मोर्चात झाले. यावेळी फाउंडेशनचे भंते गौतमरत्न महाथेरो यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी बौद्ध समाजाची जाहीर माफी मागावी आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली बुद्धभूमीचा काही भाग बाधित करण्यात आला असून बुद्धमूर्ती हटविणे, स्तूपाचे नुकसान करणे आणि झाडांची तोड करण्यात आली. तसेच या कामातून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नातेवाईकांना आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने कारवाई झाल्याचाही आरोप करण्यात आला. या आरोपांबाबत संबंधितांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
भिकू संघाच्या प्रतिनिधींनी सांगितले की, गेल्या महिनाभरापासून आंदोलन, उपोषण आणि मोर्चे सुरू असूनही शासन किंवा लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी येऊन चर्चा केलेली नाही. तसेच महापालिकेने जमिनीच्या नोंदी चुकीच्या पद्धतीने करून बुद्धभूमीवर अन्याय केल्याचा आरोपही त्यांनी केला.
मोर्चादरम्यान महापालिका आयुक्त अभिनव गोयल आणि उपायुक्त प्रसाद बोरकर यांचे तात्काळ निलंबन करावे, संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल करावेत, तसेच उड्डाणपूल नदीलगत वळविल्यास त्यातून मिळणारा मोबदला बौद्ध समाजाला द्यावा, अशा मागण्याही करण्यात आल्या.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्रालयात झालेल्या बैठकीत बुद्धभूमीच्या विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण नेमण्याचा निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालयाबाहेर बुद्धभूमी फाउंडेशनच्या भूमिकेविरोधात काही बौद्ध नागरिकांनी आंदोलन करत भंतेजींवरही गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, बुद्धभूमी फाउंडेशनने केलेले आरोप, तसेच मोर्चादरम्यान करण्यात आलेल्या मागण्यांबाबत कल्याण-डोंबिवली महापालिका, प्रशासन आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.


