कल्याण प्रतिनिधी
कल्याण : डोंबिवलीत बाप-लेकीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. आपल्या दोन पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४५ वर्षीय नराधम पित्याला मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. लहान बहिणीवर अत्याचार झाल्याचे समजताच मोठ्या मुलीने धाडस दाखवून आईला हा प्रकार सांगितल्याने या विकृत बापाचे घृणास्पद कृत्य समोर आले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील मानपाडा परिसरात हा आरोपी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहे. पीडित मुलींची आई कामानिमित्त घराबाहेर असताना ही व्यक्ती घरात एकटी असायची. याच संधीचा फायदा घेऊन हा नराधम गेल्या काही महिन्यांपासून आपल्या १९ वर्षीय मोठ्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. वडिलांच्या दहशतीमुळे पीडित मुलगी घाबरली होती आणि समाजात बदनामी होईल या भीतीने तिने ही बाब कोणालाही सांगितली नाही. मात्र मोठ्या मुलीच्या शांत राहण्याने या नराधमाची मजल अधिकच वाढली.
काही दिवसांपूर्वी या विकृत पित्याने आपल्या केवळ १० वर्षांच्या लहान मुलीलाही लक्ष्य केले. धाकट्या बहिणीसोबत घडलेला हा प्रकार पाहून मोठी बहीण हादरून गेली. आपल्यासोबत जे घडले ते आता लहान बहिणीच्या वाट्याला येऊ नये या विचाराने तिने अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. तिने तातडीने आईला गाठून वडिलांच्या या काळ्या कृत्याचा पाढा वाचला. आपल्या पोटच्या पोरींसोबत पती अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य करत असल्याचे ऐकून आईला मोठा धक्का बसला.
पीडित मुलींच्या आईने याप्रकरणी विलंब न लावता मानपाडा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करत ४५ वर्षीय नराधम पित्याला अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण डोंबिवली परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. मानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


