कल्याण प्रतिनिधी
कल्याणच्या वालधुनी परिसरात हुंड्यासाठी एका विवाहितेचा कथित छळ करून तिचे केशवपन करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित महिलेवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर येथील अफसाना (नाव बदललेले नाही) हिचा विवाह नोव्हेंबर २०२५ मध्ये कल्याणमधील समीर अन्सारी याच्याशी झाला होता. विवाहावेळी वधूपक्षाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने हुंडा देणे शक्य नसल्याची माहिती सासरच्या मंडळींना देण्यात आली होती. मात्र विवाहानंतर काही दिवसांतच अफसानाचा हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
पीडितेच्या नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, अफसाना गर्भवती असतानाही तिच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तिला वेळेवर अन्न दिले जात नव्हते. घरातील जेवण वेगळे ठेवून तिची उपेक्षा केली जात होती. तसेच विविध कारणांवरून मारहाण, आर्थिक कोंडी आणि मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गरम पाण्याने हात भाजणे, किरकोळ गरजांसाठीही पैसे न देणे आणि सतत अपमानास्पद वागणूक देणे, अशा स्वरूपाचा छळ तिच्यावर होत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या छळाची परिसीमा ७ जून रोजी गाठली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. डोक्यात उवा झाल्याचे कारण पुढे करून सासरच्या मंडळींनी अफसानाचे जबरदस्तीने केशवपन केल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे ती मानसिकदृष्ट्या खचून गेली. अखेर छळ असह्य झाल्याने अफसाना घरातून बाहेर पडून तिच्या बहिणीकडे गेली. त्यानंतर तिने दूरध्वनीद्वारे भावाला संपर्क साधून आपल्यावरील अत्याचारांची माहिती दिली.
तिचा भाऊ नीर हसन अन्सारी याने तातडीने तिची भेट घेऊन उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. तसेच राज्य शासन आणि मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे का, तसेच पोलिसांकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू होण्याची शक्यता आहे.


