सातारा प्रतिनिधी
शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्या समर्थक नगरसेवकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अंतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील भाजपच्या राजकारणाला रविवारी नवे वळण मिळाले. पक्षातील वाढत्या मतभेदांवर सार्वजनिकरित्या भाष्य करताना मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी आपल्या गटातील नगरसेवकांना थेट इशारा देत, “पूर्वीच्या आघाड्या विसरा; तुम्ही आता भाजपचे नगरसेवक आहात,” अशा स्पष्ट शब्दांत कानपिचक्या दिल्या.
सातारा येथील छत्रपती शाहू जिल्हा स्पोर्ट कॉम्प्लेक्स ,येथे महाराष्ट्र स्टेट वेटरन्स स्पोर्ट असोसिएशन फॉर ऑल स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सातारा जिल्हा प्रीमियर लीग ओव्हर आर्म टेनिस बॉल क्रिकेट (नाईट)’ स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. विशेष म्हणजे या स्पर्धेला ‘मंत्री शिवेंद्रसिंहराजे करंडक’ असे नाव देण्यात आले असून, त्याच मंचावरून त्यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षावर मिश्कील पण ठाम भाष्य केले.
‘ग्राउंडवर खेळा, बाहेर नको’
सातारा पालिकेतील सत्तासमीकरणांमुळे आणि नगरसेवकांमधील गटबाजीमुळे मागील काही दिवसांपासून भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. खासदार उदयनराजे भोसले यांनीही काही दिवसांपूर्वी नगरसेवकांची बैठक घेत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती. काही नगरसेवकांनी शिवेंद्रराजे समर्थकांविरोधात तक्रारी केल्याचेही बोलले जात होते. या सर्व घडामोडींनंतर मंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी प्रथमच उघडपणे भूमिका मांडली.
भाषणादरम्यान त्यांनी उपस्थित नगरसेवकांकडे पाहत हलक्या फुलक्या शैलीत टोला लगावला. “सगळे नगरसेवक इतक्या मोठ्या संख्येने आले आहेत, तर बनकरसाहेबांनी सगळ्यांची एक मॅचच लावून टाकावी. पण प्लेअर मिक्स करा. पहिल्यासारखं आघाड्या-आघाड्यांचं युद्ध नको,” असे म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला.
त्यानंतर त्यांनी थेट संदेश देत सांगितले, “मी आणि महाराज परवा मुंबईत होतो. आम्ही दोघांनीही तुम्हा सगळ्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, तुम्ही आता आघाड्यांचे नगरसेवक नाही, तर भाजपचे नगरसेवक आहात. त्यामुळे जुने मतभेद आणि आघाड्या विसरा.”
‘मी आणि उदयनराजे अंपायर होतो’
शिवेंद्रराजेंनी आपल्या खास शैलीत राजकीय कटुतेवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. “पुढच्या पाच दिवसांत एक दिवसाची मॅच ठेवा. मी आणि उदयनराजे दोघंही येऊन बसतो. पाहिजे तर आम्हाला अंपायर करा. कोणाला आऊट द्यायचं, कोणाला नॉटआऊट ठेवायचं, कोण कच्चा लिंबू आहे हे आम्ही ठरवतो. पण ग्राउंडच्या बाहेर काही करू नका,” असे म्हणत त्यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षावर अप्रत्यक्ष टोला लगावला.
त्यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ उडाला. मात्र, त्यामागचा राजकीय संदेश स्पष्ट असल्याची चर्चा नंतर रंगली. सातारा पालिकेतील भाजपमधील दोन गटांतील वाद आता थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचल्याचे मानले जात आहे.
विकासासाठी एकदिलाने काम करण्याचे आवाहन
राजकीय कुरघोड्या, आरोप-प्रत्यारोप आणि गटबाजी यामुळे नगरपालिकेच्या विकासकामांवर परिणाम होत असल्याची भावना पक्षश्रेष्ठींमध्ये निर्माण झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये संघटनात्मक एकजूट टिकवणे महत्त्वाचे मानले जात आहे. त्यामुळेच शिवेंद्रराजेंनी सार्वजनिक मंचावरून नगरसेवकांना एकत्र येण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जात आहे.
“पूर्वीचे मतभेद विसरून आता विकासाच्या मुद्यावर एकदिलाने काम करा,” असे आवाहन करत त्यांनी नगरपालिकेतील भाजपच्या सर्व सदस्यांना संघटित राहण्याचा संदेश दिला.
साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण
शिवेंद्रराजेंच्या या वक्तव्यानंतर सातारा शहर आणि तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. भाजपमध्ये सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आता थांबणार का, की पुढील काळात नव्या समीकरणांना जन्म मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोन्ही प्रभावी राजघराण्यांच्या राजकीय समन्वयाकडेही कार्यकर्त्यांचे डोळे लागले आहेत.
पालिकेतील गटबाजी थांबवून भाजपला एकसंध ठेवण्याचा प्रयत्न म्हणून शिवेंद्रराजेंच्या वक्तव्याकडे पाहिले जात असले, तरी स्थानिक पातळीवरील नाराजी पूर्णपणे निवळली आहे का, याबाबत मात्र राजकीय वर्तुळात अजूनही संभ्रमाचे वातावरण आहे.


