सातारा प्रतिनिधी
सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागात टेंडर पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या १११ महिला व पुरुष कंत्राटी कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने मंगळवारी नगरपालिकेत संतप्त वातावरण निर्माण झाले. रखडलेल्या पगाराबाबत जाब विचारण्यासाठी मोठ्या संख्येने कर्मचारी नगरपालिकेत दाखल झाले. मात्र, प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर मिळण्याऐवजी “संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधा” असे सांगण्यात आल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. विशेष म्हणजे, ज्या ठेकेदारामार्फत नियुक्ती करण्यात आली, त्याचे नाव, कार्यालयाचा पत्ता किंवा संपर्क क्रमांकही कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याने या प्रकरणाने नवे प्रश्न निर्माण केले आहेत.
आरोग्य विभागातील विविध कामांसाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी टेंडर प्रक्रियेद्वारे १११ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर सर्व कर्मचारी नियमितपणे आपली जबाबदारी पार पाडत आहेत. शहरातील स्वच्छता, आरोग्यविषयक सेवा आणि अन्य कामांमध्ये ते दररोज हजर राहत असतानाही अद्याप त्यांच्या खात्यात एकाही महिन्याचा पगार जमा झालेला नाही. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले असून, घरखर्च, मुलांचे शिक्षण, घरभाडे आणि कर्जाचे हप्ते भरणेही कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले.
वेतनाबाबत वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने अखेर मंगळवारी कर्मचारी थेट नगरपालिकेत पोहोचले. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत रखडलेले वेतन तातडीने अदा करण्याची मागणी केली. मात्र, प्रशासनाकडून “ठेकेदाराशी संपर्क साधा” एवढेच उत्तर मिळाल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा आहे.
याप्रकरणी कर्मचाऱ्यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, नियुक्ती प्रक्रियेतील सर्व कागदपत्रे, उपस्थिती आणि कामावर रुजू होण्याची प्रक्रिया नगरपालिकेच्या माध्यमातूनच पूर्ण करण्यात आली. त्यामुळे वेतनाची जबाबदारीही प्रशासनाचीच आहे. आता पगार मागितल्यानंतर ठेकेदाराकडे जाण्यास सांगितले जात आहे. परंतु तो ठेकेदार नेमका कोण, त्याचे कार्यालय कुठे आहे किंवा संपर्क कसा साधायचा, याची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत आमच्या हक्काच्या पगारासाठी कुणाकडे दाद मागायची? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
या प्रकारामुळे टेंडर पद्धतीने करण्यात येणाऱ्या कंत्राटी नियुक्त्यांतील पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नियुक्ती करणारी यंत्रणा, ठेकेदार आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव असल्यास त्याचा फटका थेट कर्मचाऱ्यांना बसत असल्याची भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, रखडलेले वेतन तातडीने अदा करून जबाबदारांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर नगरपालिकेचे प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित ठेकेदाराबाबत नेमकी माहिती कधी जाहीर करते, याकडे आता कर्मचारी तसेच शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.


