सातारा प्रतिनिधी
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषाने, फडकणाऱ्या भगव्या पताकांनी आणि टाळ-मृदुंगाच्या निनादाने सातारा जिल्हा बुधवारी भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात चिंब न्हाऊन निघाला.
नीरा नदीतील स्नान विधीनंतर पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले. पालखी प्रवेशाच्या वेळी सातारा पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली, तर पोलीस बँडच्या सुरेल वादनाने स्वागत सोहळ्याला विशेष दिमाख प्राप्त झाला.
जिल्ह्याच्या वतीने पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी माऊलींच्या पालखीला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
पालखीच्या स्वागतासाठी पाडेगाव परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. वारकरी हरिनामाच्या गजरात, अभंग आणि भजनांच्या तालावर तल्लीन झाले होते. “ज्ञानोबा-तुकाराम”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. पालखीचे दर्शन घेण्यासाठी महिलांसह ज्येष्ठ नागरिक, युवक आणि लहान मुलांनीही मोठी उपस्थिती लावली.
वारकऱ्यांसाठी प्रशासनाची व्यापक तयारी
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी व्यापक नियोजन केले आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर, वैद्यकीय पथके, तात्पुरती आरोग्य केंद्रे, स्वच्छतागृहे तसेच स्वच्छतेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक व्यवस्थाही सुरळीत ठेवण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
मुक्कामस्थळी ‘चरणसेवा’सह विविध स्वयंसेवी संस्थांकडून वारकऱ्यांसाठी भोजन व इतर आवश्यक सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने केलेल्या नियोजनाबद्दल वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
चार दिवस साताऱ्यात मुक्काम
संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा चार दिवस सातारा जिल्ह्यात मुक्काम करणार आहे. या कालावधीत खंडाळा आणि फलटण तालुक्यांतील नियोजित मुक्काम पूर्ण करून पालखी सुमारे ६५ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यानंतर रविवारी पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे.
पालखी पुणे जिल्ह्यातील वाल्हे येथे असतानाच मंगळवारी रात्रीपासून मोठ्या संख्येने वारकरी साताऱ्यात दाखल झाले होते. त्यांच्या निवास, भोजन आणि मूलभूत सुविधांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे पार पाडली आहे.
वारकरी संप्रदायाची शतकानुशतके जपली गेलेली परंपरा, भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देणारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात दाखल झाल्याने संपूर्ण जिल्हा भक्तिमय वातावरणाने भारावून गेला असून, माऊलींच्या स्वागतासाठी चारही मंत्र्यांसह प्रशासन आणि भाविकांनी एकत्र येत वारी परंपरेचा गौरव अधिकच उंचावला आहे.


