सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातून थेट अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणारे आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे जाळे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ‘डिजिटल अरेस्ट’, बनावट ई-कॉमर्स व्यवहार आणि गिफ्ट कार्डच्या माध्यमातून अमेरिकेतील नागरिकांकडून डॉलरमध्ये पैसे उकळणाऱ्या एका बेकायदा कॉल सेंटरचा सातारा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कोरेगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १७ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या धाडीत तब्बल ३५ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये रोख रक्कम, अत्याधुनिक लॅपटॉप, मोबाईल संच, हार्ड डिस्क, कॉलिंग सॉफ्टवेअर तसेच अमेरिकन नागरिकांचा संवेदनशील वैयक्तिक डेटा आढळून आल्याची माहिती पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
छोट्या शहरातून चालत होता ‘आंतरराष्ट्रीय फसवणुकीचा उद्योग’
कोरेगाव–रहिमतपूर मार्गावरील सुभाषनगर परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये ‘श्रीसाई लॉजिस्टीक्स अँड कन्सल्टन्स एलएलपी’ या नावाखाली फेब्रुवारी २०२६ पासून हे कॉल सेंटर सुरू करण्यात आले होते. बाहेरून पाहता सामान्य व्यावसायिक कार्यालय वाटणाऱ्या या ठिकाणी रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणुकीचा व्यवसाय सुरू असल्याचे तपासातून समोर आले आहे.
पोलिसांना नागरिकांकडून संशयास्पद हालचालींबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखाली तांत्रिक माहितीचे विश्लेषण, हालचालींवर पाळत आणि गुप्त तपास केल्यानंतर या कॉल सेंटरवर धाड टाकण्यात आली.
छाप्यात पोलिसांना अमेरिकन नागरिकांचे हजारो संपर्क क्रमांक, संवादाचे तयार स्क्रिप्ट, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि सायबर फसवणुकीसाठी वापरली जाणारी साधने सापडली. घटनास्थळावरून २१ लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
‘तुमच्या नावाने ॲमेझॉनवरून खरेदी झालीय…’; भीती दाखवून उकळपट्टी
प्राथमिक तपासात या टोळीची फसवणुकीची पद्धत अत्यंत योजनाबद्ध असल्याचे समोर आले आहे. आरोपी अमेरिकेतील नागरिकांना फोन करून स्वतःला सरकारी अधिकारी, तपास यंत्रणेचे कर्मचारी किंवा ई-कॉमर्स कंपनीचे प्रतिनिधी म्हणून सादर करत असत.
“तुमच्या नावाने ॲमेझॉनवरून संशयास्पद खरेदी झाली आहे”, “तुमच्या बँक खात्याचा गैरवापर झाला आहे” किंवा “तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात आले आहे” अशा स्वरूपाच्या धमकीवजा संदेशांनी नागरिकांना मानसिक दबावाखाली आणले जात होते.
जर संबंधित व्यक्तीने व्यवहार नाकारला, तर आरोपी बनावट ऑर्डर क्रमांक, बनावट संदेश, खोटे ई-मेल किंवा कॉल आयडी वापरून विश्वासार्हतेचा आव आणत. त्यानंतर “ऑर्डर रद्द करण्यासाठी गिफ्ट कार्ड खरेदी करा”, “कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी तातडीने पैसे भरा” किंवा “खाते सुरक्षित करण्यासाठी डॉलर ट्रान्सफर करा” अशा कारणांनी आर्थिक उकळपट्टी केली जात होती.
तपासात या व्यवहारांसाठी डॉलर-आधारित पेमेंट सिस्टीम, गिफ्ट कार्ड आणि ऑनलाइन ट्रान्सफर चॅनेल्सचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबईतील संशयित, साताऱ्यातील अड्डा
या प्रकरणात सागर हरिश्चंद्र सूर्यवंशी याच्यासह वीरेंद्र बोडरे, अक्षय भंडारी, गुरुप्रसाद राणे, मनिष जोशी, शमशुद्दीन सय्यद, गौरव लांडगे, अभिषेक गुप्ता, इशांत खांडेकर, रितेश चौहान, बाबू चलवादी, अवि वानखेडे, दीपक खंडारे, मोहंमद शफिक कोकणे, ओमकार घार्गे, दिपेन जाधव आणि लेबीन सायमन यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय चार महिलांची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
विशेष म्हणजे, या सर्व संशयितांचे वास्तव्य मुंबई आणि आसपासच्या भागात असल्याचे समोर आले आहे. मात्र, मोठ्या शहरांपेक्षा कोरेगावसारख्या तुलनेने शांत भागात कॉल सेंटर सुरू केल्यास पोलिसांचे किंवा स्थानिकांचे लक्ष कमी जाईल, असा आरोपींचा अंदाज असल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
रात्री दहा ते सकाळी आठ; अमेरिकन वेळेनुसार सुरू असायचे ऑपरेशन
हे कॉल सेंटर भारतातील वेळेनुसार रात्री १० ते सकाळी ८ या कालावधीत कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. अमेरिकेतील वेळेनुसार नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी ही वेळ ठरवण्यात आली होती. कॉलिंग एजंटना तयार संवाद, मानसशास्त्रीय दबाव तंत्रे आणि फसवणुकीची विशेष प्रशिक्षण पद्धती वापरण्याच्या सूचना दिल्या जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
अमेरिकन नागरिकांचा डेटा कुठून आला?
या प्रकरणातील सर्वांत गंभीर प्रश्न म्हणजे अमेरिकन नागरिकांचा वैयक्तिक डेटा या टोळीपर्यंत पोहोचला कसा? हा डेटा डार्क वेब, डेटा लीक, बेकायदा विक्री नेटवर्क किंवा इतर सायबर माध्यमांतून मिळवला गेला का, याचा शोध तपास यंत्रणा घेत आहेत.
याशिवाय, या कॉल सेंटरमधून आतापर्यंत किती आर्थिक उलाढाल झाली, पैसे कोणत्या मार्गाने जमा झाले, ते परदेशात किंवा देशांतर्गत कुठे ट्रान्सफर करण्यात आले, या संपूर्ण आर्थिक साखळीचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय तपास संस्थांची मदत घेण्याची शक्यता
या फसवणुकीचे धागेदोरे थेट परदेशाशी जोडले गेल्याने राज्य आणि केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांसोबतच आंतरराष्ट्रीय सायबर तपास संस्थांची मदत घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अमेरिकन तपास यंत्रणांशी समन्वय साधण्याचाही पर्याय तपासात पुढे येऊ शकतो.
दरम्यान, या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
‘डिजिटल अरेस्ट’, बनावट ई-कॉमर्स व्यवहार, संशयास्पद कॉल, गिफ्ट कार्डच्या नावाखाली पैसे मागणे किंवा सरकारी अधिकाऱ्यांच्या नावाने दबाव टाकण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सायबर गुन्हेगारांची जाळी आता महानगरांपुरती मर्यादित राहिलेली नाही; ग्रामीण आणि निमशहरी भागांतूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील फसवणूक रॅकेट चालवली जात असल्याचे साताऱ्यातील या कारवाईने खळबळ उडाली आहे.


