सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले. खंडाळा तालुक्यात ढगफुटीसदृश्य मुसळधार पाऊस कोसळल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले, रस्त्यांना नदीचे स्वरूप आले तर अनेक गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. दुसरीकडे सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज कोसळून एका मेंढपाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिट गावातही वीज पडून एका गाईचा जागीच मृत्यू झाला. अचानक कोसळलेल्या या अवकाळी संकटामुळे जिल्हाभरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना वळीव पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली असून भाजीपाला, मका, ज्वारी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नागठाण्यात वीज कोसळून मेंढपाळाचा मृत्यू
सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटामुळे परिसर हादरून गेला. याचदरम्यान मेंढ्या घेऊन आलेले तुकाराम होनमाने (वय ६०, रा. गोरडवाडी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) हे नागठाणे येथील पेट्रोलपंप परिसरात लिंबाच्या झाडाखाली आश्रयासाठी थांबले होते. मात्र अचानक झाडाजवळ वीज कोसळली आणि त्यात होनमाने यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. विजांच्या सततच्या कडकडाटामुळे नागठाणे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पावसामुळे वीजपुरवठाही खंडित झाला होता.
खंडाळा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाचा तडाखा
दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडाळा तालुक्याच्या पश्चिम भागात शुक्रवारी अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. कण्हेरी, अतिट, सांगवी, कर्नवडी, लोहम, जवळे, झगलवाडी, लिंबाचीवाडी, घाडगेवाडी, कवठे आणि वडगाव परिसरात तासभर मुसळधार पाऊस कोसळला. काही ठिकाणी ढगफुटीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती.
अतिट आणि सांगवी परिसरात ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले. रस्त्यांवरून पाण्याचे प्रचंड लोट वाहत होते. उतारावरील भागांमध्ये चिखल आणि पाण्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. अनेक शेतकऱ्यांना शेतातून जीव मुठीत धरून बाहेर पडावे लागले.
अतिट येथे वीज कोसळून रामदास राजाराम जाधव यांच्या गाईचा मृत्यू झाला. अनेक जनावरे घाबरून पळाल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण होते. मुसळधार पावसामुळे शेतातील बांध फुटले असून पिके पाण्याखाली गेली आहेत.
प्रशासन सतर्क; पंचनाम्यांचे आदेश
खंडाळा तालुक्यातील परिस्थिती गंभीर होताच महसूल प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. तहसीलदार रविराज जाधव यांच्या सूचनेनुसार आपत्कालीन यंत्रणा सक्रिय करण्यात आली. प्रशासनाने रात्री उशिरापर्यंत विविध गावांमध्ये पाहणी केली.
दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी महसूल व कृषी विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
पुणे-बंगळुरू महामार्ग जलमय
अवकाळी पावसाचा फटका राष्ट्रीय महामार्गालाही बसला. साताऱ्याजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने महामार्गाला अक्षरशः नदीचे स्वरूप आले होते. नागठाणे आणि निसराळे परिसरात सेवा रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले होते.
भुयारी मार्ग पूर्णपणे जलमय झाल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली. चारचाकी वाहनधारकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली, तर अनेक दुचाकीस्वारांनी वाहने थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. काही ठिकाणी वाहतूक मंदावली होती.
शेतकऱ्यांसमोर नवं संकट
अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांपुढे नवं संकट उभं राहिलं आहे. उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे ग्रामीण भागात चिंता व्यक्त केली जात आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


