सातारा प्रतिनिधी
देशव्यापी औषध विक्रेता बंदच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज (दि. २०) औषध विक्रेत्यांचा बंद असला तरी शहर व जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांशी संलग्न औषध दुकाने सुरू राहणार असून, मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या औषध विक्री क्षेत्रातील साखळी कंपन्यांची दुकाने तसेच जेनेरिक औषध दुकाने नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.
औषधांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध औषध सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने विविध मागण्यांसाठी २० मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिल्याने अनेक भागांतील औषध दुकाने बंद राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने पर्यायी व्यवस्था सज्ज ठेवली आहे.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सातारा येथील सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांशी संलग्न मेडिकल स्टोअर्स आणि काही निवडक औषध दुकाने सुरू राहणार आहेत. विशेषतः मेडप्लस, वेलनेस फॉरएव्हर यांसारख्या साखळी औषध विक्री केंद्रांसह जेनेरिक औषध दुकाने नागरिकांसाठी उपलब्ध राहतील.
प्रशासनाने स्पष्ट केले की, औषध दुकानदारांना दिलेले परवाने हे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० अंतर्गत विविध अटी व नियमांच्या अधीन राहून देण्यात आले आहेत. रुग्णांना वेळेवर औषधे उपलब्ध करून देणे हा त्या परवान्यांचा मूलभूत उद्देश असल्याने बंदच्या काळात कृत्रिम औषध टंचाई निर्माण होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे.
दरम्यान, औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा तसेच इतर लागू कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच सर्व केमिस्ट बांधवांनी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहनही सहाय्यक आयुक्त रु. वि. पोंगळे यांनी केले आहे.
नागरिकांनी आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्याची आगाऊ व्यवस्था करून ठेवावी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
आपत्कालीन संपर्क क्रमांक
सहाय्यक आयुक्त (औषधे), सातारा – रु. वि. पोंगळे : ९७३००८५५८८
औषध निरीक्षक, सातारा – वि. वि. पाटील : ९१५८८२०७८५


