सातारा प्रतिनिधी
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक वेगाने जोडणारा महत्त्वाकांक्षी तापोळा-गाढवली केबल स्टेड पूल आता अंतिम टप्प्यात आला असून, पावसाळ्यानंतर हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार असल्याने पर्यटन, व्यापार आणि स्थानिक वाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे.
तब्बल १७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा पूल पश्चिम महाराष्ट्रातील पहिलाच आधुनिक केबल स्टेड पूल ठरणार आहे. मुंबईतील वरळी सी-लिंकच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पामुळे कोकणातील दुर्गम भागांचा संपर्क अधिक सुलभ होणार आहे. तापोळा ते गाढवली या मार्गावर उभारण्यात आलेल्या पुलाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
४३ मीटर उंच व्ह्यू गॅलरी ठरणार आकर्षण
५४० मीटर लांबी आणि १४ मीटर रुंदी असलेल्या या पुलाच्या मध्यभागी तब्बल ४३ मीटर उंचीची आकर्षक व्ह्यू गॅलरी उभारण्यात आली आहे. पर्यटकांना कोयना परिसरातील निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेता यावा यासाठी येथे विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. व्ह्यू गॅलरीपर्यंत पोहोचण्यासाठी आधुनिक कॅप्सुल लिफ्ट बसविण्यात येणार असून, दोन्ही बाजूंनी जिन्यांचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.
या पुलाचे बांधकाम टी अँड टी कंपनीकडे सोपविण्यात आले असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काम पूर्ण करण्यात आले आहे.
पोलादपूर-अंबेनळी घाटाचा वळसा टळणार
सध्या रत्नागिरीतून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी वाहनांना पोलादपूरमार्गे अंबेनळी घाटाचा मोठा वळसा घ्यावा लागतो. मात्र हा नवीन पूल सुरू झाल्यानंतर हा लांबचा आणि वेळखाऊ मार्ग टाळता येणार आहे. परिणामी इंधन, वेळ आणि प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल.
तसेच खेड तालुक्याच्या सीमेवरील रघुवीर घाट मार्गावर बामणोली ते आपटी या दरम्यान आणखी एका पुलाचे कामही सुरू असून, कोकण-पश्चिम महाराष्ट्र संपर्कासाठी ही संपूर्ण साखळी महत्त्वाची मानली जात आहे.
रखडलेल्या प्रकल्पाला मिळाली गती
शिवसेना-भाजप युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या कार्यकाळात या पुलाची संकल्पना मांडण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे प्रकल्प रखडला होता. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळताना एकनाथ शिंदे यांनी या कामाला गती दिली आणि प्रकल्प प्रत्यक्ष पूर्णत्वाकडे नेला.
दरे-बामणोलीदरम्यान आणखी ३०० कोटींचा पूल
दरम्यान, सातारा जिल्ह्यातील दरे गाव आणि कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणारा आणखी एक महत्त्वाकांक्षी पूलही प्रस्तावित करण्यात आला आहे. सुमारे ३०० कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या पुलामुळे कोयना आणि खांदाटी खोऱ्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
विशेषतः पावसाळ्यात कोयना बॅकवॉटरमधून बार्जच्या साहाय्याने करावा लागणारा धोकादायक प्रवास टाळता येणार असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
पर्यटनाला नवी संजीवनी
महाबळेश्वर, तापोळा, कोयना आणि कोकण किनारपट्टी या पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या भागांना या पुलामुळे नवी ओळख मिळणार आहे. कमी वेळेत प्रवास शक्य होणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक आणि शेतकरी वर्गालाही या प्रकल्पाचा मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.


