सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या समृद्ध कुस्ती परंपरेला नवा उत्साह देणाऱ्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या ५२ व्या पर्वाचा रविवारी सातारच्या लाल मातीत दिमाखदार प्रारंभ झाला. पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना, ढोल-ताशांचा गजर आणि हजारो कुस्तीप्रेमींच्या उपस्थितीत छत्रपती शाहू स्टेडियम परिसर अक्षरशः कुस्तीमय बनून गेला होता. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील नामांकित मल्लांनी ताकद, चपळाई आणि डावपेचांचा जबरदस्त आविष्कार सादर करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विधिवत पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आखाड्याची पूजा करून पारंपरिक कुस्ती लावण्यात आली आणि त्यानंतर हिंदकेसरी किताबासाठीच्या अधिकृत लढतींना प्रारंभ झाला.


