सातारा प्रतिनिधी
इतिहासाचे वैभव आणि स्वराज्याच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या किल्ले प्रतापगडच्या संवर्धन कामाला गती देण्याबरोबरच कामाचा दर्जा उच्च ठेवण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी संबंधित यंत्रणेला दिले. किल्ल्यावर सुरू असलेल्या संवर्धन कामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी कामाच्या संथ गतीबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.
प्रतापगडावरील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या दुरुस्ती आणि संवर्धन कामांची पाहणी करताना जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, विजय नायडू यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. संवर्धनाच्या कामांदरम्यान ऐतिहासिक वास्तूंचे मूळ स्वरूप अबाधित राहणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पालकमंत्र्यांनी अधोरेखित केले.
संवर्धनाच्या बांधकामाला नियमित पाणी मारले जात नसल्याच्या तक्रारी स्थानिकांकडून करण्यात आल्या. त्यावर पालकमंत्री देसाई यांनी संबंधित ठेकेदारांना फटकारले. “किल्ल्यावर पाण्याची उपलब्धता मर्यादित असली तरी कामाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ देता येणार नाही. आवश्यक असल्यास टँकरद्वारे पाणी आणून बांधकामाची निगा राखावी,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
प्रतापगड संवर्धनाच्या कामाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचे सांगत, या कामात कोणतीही हलगर्जी किंवा निकृष्ट काम सहन केले जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. संवर्धनाचे काम हे केवळ दुरुस्ती नसून राज्याच्या ऐतिहासिक वारशाचे जतन असल्याचे त्यांनी नमूद केले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रतापगडाचे मूळ स्वरूप जपूनच संवर्धन व्हावे, यावर पालकमंत्री देसाई यांनी विशेष भर दिला. किल्ल्यावरील अनावश्यक झाडेझुडपे हटवून परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देतानाच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. इतिहास, पर्यावरण आणि पर्यटन यांचा समतोल राखून संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संवर्धनासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही देत पालकमंत्री देसाई यांनी प्रतापगडाच्या जतनासाठी प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याचे आवाहन केले. स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित असलेल्या या किल्ल्याचे जतन ही केवळ प्रशासनाची नव्हे, तर समाजाचीही सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


