सातारा प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना प्रतिष्ठेचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. माजी विधान परिषद सभापती व ज्येष्ठ आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी आमदार बाळासाहेब पाटील तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्री मकरंद पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना केली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशाच्या ऊर्जा क्षेत्रातील भविष्यासंदर्भात मोठी घोषणा केली. “देशात लवकरच १०० टक्के इथेनॉल इंधनावर चालणारी वाहने रस्त्यावर धावतील. त्यामुळे पेट्रोलवरील अवलंबित्व कमी होऊन इंधन आयातीवरील मोठा खर्च वाचेल,” असे त्यांनी सांगितले.
हायड्रोजन इंधन हे देशाचे भविष्य असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, “शेतकऱ्यांनी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जदाता आणि इंधनदाता व्हावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करणे आवश्यक आहे.”
देशातील पायाभूत सुविधांबाबत बोलताना त्यांनी पुणे-सातारा आणि पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवासाबाबत महत्त्वाची माहिती दिली. “पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात, तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेतीन तासांत पूर्ण होईल. पुढील तीन वर्षांत देशातील सर्व मोठे रस्ते प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शेती क्षेत्रात बायो इंधनाचा वापर वाढविण्याची गरज अधोरेखित करताना त्यांनी जलसंधारणावर भर दिला. “पाणी हीच खरी संपत्ती आहे. जलसंधारणावर लक्ष केंद्रित केल्यास शेती अधिक फायदेशीर आणि समृद्ध होईल,” असे ते म्हणाले.
बायो इंधनाचा वापर लवकरच विमान वाहतूक क्षेत्रातही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. “भारत इंधन आयात करणारा नव्हे, तर इंधन निर्यात करणारा देश बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच वेस्ट प्लास्टिकपासून रस्ते निर्मितीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प देशात सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.


