सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्याच्या विकासनकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात ते बोलत होते.
शहरातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण पार पडले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमास उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई यांनी आपल्या भाषणात राज्याच्या विकासदृष्टीकोनाचा आढावा घेताना परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने कायम आघाडी राखल्याचा उल्लेख केला. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेत राज्याने मोठ्या प्रमाणावर सामंजस्य करार केले, असे त्यांनी नमूद केले. जलसंपदा व्यवस्थापनाच्या दृष्टीने अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यास शासन प्राधान्य देत असून, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची भूमिका स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्याच्या विकास उपक्रमांचा उल्लेख करताना ‘मॉडेल स्कूल’ आणि ‘स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र’ या योजनांचे सादरीकरण थेट पंतप्रधानांसमोर झाले, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे देसाई यांनी अधोरेखित केले. जिल्हा नियोजन समिती आणि सीएसआर निधीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयातून विकासयात्रा अधिक गतीमान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी संबंधित अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कार आणि आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कारही प्रदान करण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील गुणवंत खेळाडू आणि मार्गदर्शकांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
यापूर्वी पालकमंत्री देसाई यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच कर्नल महाडिक स्मृती उद्यानात आदरांजली वाहून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
राज्य स्थापनेचा उत्सव आणि विकासाचा संकल्प यांची सांगड घालणारा हा सोहळा साताऱ्यात उत्साहात पार पडला.


