सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जिल्हास्तरावरील मुख्य ध्वजवंदन सोहळा शुक्रवार, दि. १ मे रोजी सकाळी ८ वाजता श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे पार पडणार आहे. या सोहळ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार आहे.
राज्याच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करत हा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे. कार्यक्रमस्थळी विविध विभागांचे पथसंचलन, शासकीय योजना व उपक्रमांचे दर्शन घडविणारे देखावे तसेच सांस्कृतिक सादरीकरणांचीही रंगत पाहायला मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या सोहळ्यास जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, या ध्वजवंदन कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.


