सातारा प्रतिनिधी
सातारा : “मैत्री म्हणजे प्रगतीची पायरी असते आणि योग्य मित्राची निवड केली तर आयुष्याची हिरवळ बनते,” याचा जिवंत प्रत्यय साताऱ्यात पाहायला मिळाला आहे. पोलीस दलात बारा वर्षांपूर्वी एकत्र भरती झालेल्या तीन जिगरी मित्रांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. स्वप्निल पवार, दीपक साठे आणि सनील निकम अशी या यशस्वी त्रिकुटाची नावे असून, त्यांच्या या यशामुळे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हे तिन्ही मित्र १२ वर्षांपूर्वी पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले होते. सातारा, वाई आणि शाहूपुरी पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असताना विविध गुन्ह्यांची उकल करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. उच्चशिक्षित असूनही पोलीस दलाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याच्या जिद्दीतून त्यांनी सुरुवातीला शिपाई पदावर काम करण्याचा धाडसी निर्णय घेतला. मात्र, मनात अधिकारी होण्याचे स्वप्न कायम होते. खाकी वर्दीतील आव्हानात्मक ड्युटी सांभाळत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.
या यशामागे प्रचंड कष्ट दडलेले आहेत. पहाटे ५ वाजल्यापासून शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी मैदानात घाम गाळणे आणि रात्री ११ वाजेपर्यंत लेखी परीक्षेचा अभ्यास करणे, असा त्यांचा नित्यक्रम होता. ड्युटीचे तास सांभाळून त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले. अखेर जेव्हा परीक्षेचा निकाल लागला, तेव्हा हे तिन्ही मित्र एकाच वेळी उत्तीर्ण झाल्याचे समोर आले. या बातमीने पोलीस दलासह त्यांच्या मित्रपरिवारात आनंदाची लाट उसळली.
तिन्ही मित्रांच्या यशानंतर त्यांच्या मूळ गावी आणि पोलीस वसाहतींमध्ये गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. वाजत-गाजत भव्य मिरवणुका काढून ग्रामस्थांनी आपल्या लाडक्या सुपुत्रांचे जंगी स्वागत केले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी या नूतन अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले आहे. “आता हे तीन अधिकारी आपल्या कर्तव्यदक्षतेने पोलीस दलाचे नाव अधिक उज्ज्वल करतील,” असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला.


