लातूर प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला सायबर पोलिस ठाण्याच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. आधुनिक सुविधांनी सज्ज या इमारतीमुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासात अधिक गती व कार्यक्षमता येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास आमदार, खासदारांसह वरिष्ठ प्रशासनिक व पोलिस अधिकारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा देताना गुन्हे उघडकीस आणण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपायांवर भर देण्यात आल्याचे नमूद केले. ‘आपले लातूर, सुरक्षित लातूर’ उपक्रमांतर्गत ५१० सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे, विद्यार्थी संवाद आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
सायबर पोलिस निरीक्षक बबिता वाकडकर यांनी आतापर्यंत सायबर फसवणुकीतील ७७ लाख रुपये तक्रारदारांना परत मिळवून दिल्याचे सांगितले. तसेच डिजिटल गुन्ह्यांना तोंड देण्यासाठी अद्ययावत यंत्रणेची गरज अधोरेखित केली.
दरम्यान, शहरात सुरू असलेली क्यूआर कोड आधारित पेट्रोलिंग प्रणाली आता जिल्ह्यातील २३ पोलिस ठाण्यांपर्यंत विस्तारली जाणार असून ९०७ ठिकाणी क्यूआर कोड बसविण्यात आले आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्र्यांनी क्यूआर कोड स्कॅन करून केला.
यावेळी ‘लोकशक्ती रिल्स’ स्पर्धेची घोषणा करण्यात आली असून सायबर गुन्हे, व्यसनाधीनता व वाहतूक नियमांबाबत जनजागृती करणे हा उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच नव्याने भरती झालेल्या ४६ पोलिसांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.


