लातूर प्रतिनिधी
औसा : पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) दिलासा दिला. औसा तालुक्यातील खरोसा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी करपलेल्या सोयाबीन पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी हातात करपलेल्या सोयाबीनच्या पेंढ्या घेऊन पिकांना दाणे न भरल्याची व्यथा मांडत पंचनाम्याच्या प्रक्रियेत वेळ न घालवता सरसकट मदत देण्याची मागणी केली. त्यावर, येत्या दोन दिवसांत दुष्काळाचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात येईल आणि नुकसान सरसकट असल्याने मदतही सरसकट दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पंचनामे ही कायदेशीर प्रक्रिया असल्याचे स्पष्ट करताना शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन दिले. लातूर जिल्ह्यात यंदा सुमारे ५० टक्केच पाऊस झाल्याचे सांगत त्यांनी १९७२ नंतरच्या काळातील मोठ्या दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख केला. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा, अन्नधान्य आणि आर्थिक मदतीचे नियोजन करण्यात येत असून, जलसंधारण तसेच रोजगारनिर्मितीची कामेही हाती घेतली जातील, असे त्यांनी नमूद केले.
खरीप पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके घेता यावीत, यासाठीही मदत दिली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. दुष्काळी मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पाणी आणि चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून लातूर जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विविध पर्यायांवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर आणि सांगलीकडून पाणी आणण्याच्या उपाययोजनांचाही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असून कर्जमाफीची रक्कम दिली जाईल, तसेच दुष्काळाची मदतही खात्यावर जमा केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी खरोसा पाच खेडी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मांडला. वीजबिलाच्या थकबाकीमुळे रखडलेली योजना शासनाच्या माध्यमातून बिल भरून पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. या पाहणीवेळी लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, माजी आमदार दिनकर माने यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, भाजप पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.


