लातूर प्रतिनिधी
जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उष्माघाताच्या घटनांत वाढ होत असून, औसा तालुक्यातील एरंडी येथे २५ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतातून प्रखर उन्हात घरी परतल्यानंतर अचानक चक्कर येऊन तो कोसळला आणि उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, जिल्ह्यातील उष्णतेच्या परिस्थितीबाबत चिंता वाढली आहे.
माहितीनुसार, एरंडी येथील महेश लिंबाजी इंगोले (वय २५) हे २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास शेतातून काम आटोपून घरी परतले. त्या वेळी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता. घरी आल्यानंतर अंगणातील टाकीतून पाणी घेत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना औसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर नातेवाइक व ग्रामस्थांनी उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. महेश इंगोले यांच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार असून, कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, औसा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली असून, सलग दोन दिवस तापमान ४० ते ४१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदवले गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये उष्णतेपासून बचावासाठी उपाययोजना करण्याची धावपळ सुरू आहे.
चार दिवसांत दुसरी घटना
तालुक्यातील गोंद्री गावात १९ एप्रिल रोजी अवघ्या नऊ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शिया नेताजी गोरे या बालकाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे अल्पावधीतच उष्णतेमुळे दोन मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून प्रशासनाने परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
अहवालानंतरच कारण स्पष्ट होणार
दरम्यान, महेश इंगोले यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
“मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण सांगता येईल,” अशी माहिती औसा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक सुनीता पाटील यांनी दिली.
उन्हाचा प्रकोप वाढत असताना नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे आदी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.


