लातूर प्रतिनिधी
इन्स्टाग्रामवरील धमक्या जीवावर; सुसाईड नोट लिहून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील मोरवड येथे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद, सोशल मीडियावरून मिळणाऱ्या धमक्या आणि मानसिक छळ यामुळे एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करत चौघांना ताब्यात घेतले आहे.
मोरवड येथील तेजस दिलीप घोडके असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजसचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. या वादानंतर काही जणांकडून इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तेजसला सातत्याने धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. त्याला बदनामीची भीती दाखवण्यात येत होती, तसेच कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी देत मानसिक दबाव टाकला जात होता, अशी माहिती समोर आली आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून तेजसने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्यावर होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे. “मी फाशी स्वखुशीने घेत नाही, पण मला मजबूर करण्यात आले,” असे नमूद करत इन्स्टाग्रामवरून मिळालेल्या धमक्यांचा तपशील त्याने लिहून ठेवला होता. “तू मर, नाहीतर तुझ्या भावाला मारून टाकू”, “तुझ्या कुटुंबीयांना संपवू” अशा स्वरूपाच्या धमक्या मिळत असल्याचा दावा त्याने नोटमध्ये केला आहे.
याप्रकरणी मयताचे वडील दिलीप निवृत्ती घोडके यांनी रेणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी मोहिते, रोहन काळे, नागेश गंगणे, अशोक गंगणे, पवन मोहिते, किंचक घोडके आणि रंजना घोडके यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. सोशल मीडियावरील धमक्या कितपत गंभीर होत्या, आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यामागे नेमकी कोणाची भूमिका होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, तेजसच्या मृत्यूमुळे घोडके कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.


