पुणे प्रतिनिधी
पुण्याच्या विकासाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. पुणेकरांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (३ नोव्हेंबर) शिवाजीनगर ते हिंजवडीदरम्यानच्या पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ अर्थात ‘पिंक लाइन’चे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांचे भूमिपूजनही करण्यात आले. तब्बल २१ हजार ८०० कोटी रुपयांच्या मेट्रो प्रकल्पांमुळे पुणे आणि परिसराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी पुणे मेट्रोला विकासाचे उत्तम मॉडेल संबोधत ‘We Will Do It’चा नारा दिला.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राज्यातील वरिष्ठ नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेत पुणेकरांना संबोधित केले.
पुणे मेट्रो म्हणजे विकासाचं उत्तम मॉडेल!
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, दिवाळी अगदी जवळ आली आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. सण-उत्सवांचा आनंद द्विगुणित होतो, जेव्हा आयुष्यात नव्या सुविधा जोडल्या जातात. आज पुणेकरांसाठी असाच आनंदाचा दिवस आहे. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचे लोकार्पण होत असून, यामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे.
दहा वर्षांपूर्वी पुणे मेट्रोच्या पहिल्या कामाचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली होती. आज तिसरी मार्गिका सुरू होत आहे. विशेषतः हिंजवडीसारख्या मोठ्या आयटी हबला या मेट्रोचा मोठा फायदा होणार आहे. पुण्याच्या जुन्या आणि नव्या भागांना मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याचे काम होत आहे. यासाठी मी पुणेकरांचे आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो.
पुणे शहराने कायमच देशाला आणि महाराष्ट्राला नवी दिशा दिली आहे. कल्पकतेपासून उत्पादन क्षेत्रापर्यंत अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये पुण्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता मेट्रोचे जाळे विस्तारत असल्याने पुण्याच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे, असे मोदी यांनी नमूद केले.
जुन्या सरकारच्या धोरणांपेक्षा आमची विकासाची गती वेगळी!
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शहरांमध्ये आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. पुणे मेट्रो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचतो, वाहतुकीचा ताण कमी होतो आणि शहरातील जीवनमान सुधारते. कोणत्याही शहराचा विकास आणि त्या शहराचा दर्जा उंचावण्यात मेट्रोची भूमिका महत्त्वाची असते.
देशातील पहिली मेट्रो सेवा १९८४ मध्ये सुरू झाली. त्यानंतरच्या जवळपास ३० वर्षांत देशात केवळ २४८ किलोमीटरचे मेट्रो जाळे उभे राहिले होते. २०१४ पर्यंत देशातील अवघ्या पाच शहरांमध्ये मेट्रो सेवा उपलब्ध होती. मात्र, जुन्या विचारसरणीने आणि जुन्या धोरणांनी देशाचा विकास होऊ शकत नाही. २०१४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बदलण्याचा संकल्प केला.
गेल्या बारा वर्षांत देशातील मेट्रो व्यवस्थेचा मोठा विस्तार झाला आहे. २०१४ पूर्वी पाच शहरांपुरती मर्यादित असलेली मेट्रो सेवा आता २६ शहरांपर्यंत पोहोचली आहे. देशातील मेट्रो मार्गांचे जाळे १२०० किलोमीटरपेक्षा अधिक विस्तारले आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर बदलत्या भारताच्या विकासाची दिशा आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
२१ हजार ८०० कोटींचे प्रकल्प; पुण्याच्या मेट्रोचा विस्तार!
पुणे मेट्रोची तिसरी मार्गिका म्हणजेच पिंक लाइन सुमारे २३ किलोमीटर लांबीची असून, ती माण ते शिवाजीनगर जिल्हा न्यायालयादरम्यान धावणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ८ हजार ३१३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हिंजवडी आयटी पार्क, वाकड, बाणेर, बालेवाडी आणि शिवाजीनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांना या मार्गिकेचा फायदा होणार आहे.
या मार्गिकेवरील एकूण २३ स्थानकांपैकी पहिल्या टप्प्यात १७ स्थानकांवर ४ नोव्हेंबरपासून प्रवासी सेवा सुरू होणार आहे. उर्वरित स्थानके टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही मेट्रो सेवा महिला ट्रेन ऑपरेटरद्वारे चालवली जाणार आहे. तसेच, या मार्गिकेच्या विजेच्या एकूण गरजेपैकी सुमारे ३० टक्के वीज सौरऊर्जेतून उपलब्ध करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील चार नव्या मार्गिकांसाठी सुमारे १३ हजार ५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते विठ्ठलवाडी, खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप ते माणिकबाग या मार्गिकांचा समावेश आहे.
‘We Will Do It’चा नारा; विकासाचा आत्मविश्वास!
पुणे मेट्रोचा विस्तार हा केवळ वाहतुकीचा प्रकल्प नसून आधुनिक, विकसित आणि सक्षम भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या, आयटी क्षेत्राचा विस्तार आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज आहे.
पुणे मेट्रोमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल आणि वाहतूक कोंडी व प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर नवे संकल्प आणि नवी उद्दिष्टे घेऊन पुढे जाण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या मनात विकासाचा आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली पाहिजे. याच भावनेतून ‘We Will Do It’ हा नारा देत पंतप्रधान मोदी यांनी पुणेकरांमध्ये विकासाचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेच्या लोकार्पणासोबतच दुसऱ्या टप्प्यातील नव्या मार्गिकांचे भूमिपूजन झाल्याने पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या विस्ताराचा नवा अध्याय सुरू झाला आहे.


