मुंबई प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीपूर्वी प्रशासकीय बदल्यांचे सत्र सुरूच असून, पोलीस दलातील १६ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांनंतर आता महसूल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर बदलण्यात आले आहे. राज्य सरकारने २४ अपर जिल्हाधिकारी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, बदल्या व पदोन्नतीचे आदेश जारी केले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी जारी झालेल्या या आदेशांमुळे महसूल विभागासह विविध शासकीय प्राधिकरणे आणि प्रशासकीय कार्यालयांमध्ये महत्त्वाचे फेरबदल झाले आहेत.
या बदल्यांमध्ये जिल्हाधिकारीपदापासून अपर जिल्हाधिकारी, सहआयुक्त, महाव्यवस्थापक, उपसचिव आणि अन्य महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, काही अधिकाऱ्यांना नव्या पदावर तातडीने रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल सुरू झाली आहे.
परभणीच्या जिल्हाधिकारीपदी अण्णासाहेब चव्हाण
या फेरबदलांमधील महत्त्वाची नियुक्ती म्हणजे अण्णासाहेब दादू चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी झालेली नियुक्ती. विद्यमान जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण हे ३१ ऑक्टोबर रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यांच्या जागी मुंबईतील महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील पाडळीवाडी येथील रहिवासी आहेत.
अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचा तपशील
१) अण्णासाहेब दादू चव्हाण – परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती.
२) प्रविण कृष्णा साळुंखे – नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
१४) उदय रामहरी किसवे – नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणात अपर जिल्हाधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर बदली.
१५) विजयसिंह पांडुरंग पाटील – सहकारमंत्र्यांच्या कार्यालयात खाजगी सचिव म्हणून प्रपत्र बढती.
१६) विनय यशवंत गोसावी – धुळे येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.
१७) भिमराज रामराव दराडे – श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथील अपर जिल्हाधिकारी तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून मुंबई उपनगरातील रिक्त पदावर बदली.
१८) नंदकुमार माधव कोष्टी – महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती.
१९) तुकाराम देवराम हुलवळे – सिडको, मुंबई येथून शिर्डी येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून बदली.
२०) संतोष मच्छिंद्र थिटे – चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी पदावरून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात सहआयुक्त म्हणून बदली.
२१) प्रविण रत्नाकर महिरे – चंद्रपूर येथे अपर जिल्हाधिकारी पदाच्या रिक्त जागेवर नियुक्ती.
२२) पद्मश्री श्रीराम बैनाडे – महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगात उपसचिव म्हणून बदली.
२३) वसुंधरा शिवाजी बारवे – पुणे महानगरपालिकेच्या उपायुक्त पदावरून यशदामध्ये सहयोगी प्राध्यापक म्हणून नियुक्ती.
२४) शुभांगी अनिल साठे – सिंधुदुर्गच्या अपर जिल्हाधिकारी पदावरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगात उपसचिव म्हणून बदली.
कुंभमेळा प्राधिकरणापासून महिला आयोगापर्यंत महत्त्वाच्या नियुक्त्या
या फेरबदलांमध्ये केवळ जिल्हास्तरीय महसूल प्रशासनापुरते बदल मर्यादित नसून, राज्यातील महत्त्वाच्या प्राधिकरणांमध्येही अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोग अशा महत्त्वाच्या संस्थांमध्ये नव्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत.
विशेषतः नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणातील नियुक्तीला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणातील बदल्यांमुळे या संस्थांच्या प्रशासकीय कामकाजातही नव्या अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दिवाळीपूर्वी प्रशासकीय फेरबदलांचे सत्र
राज्यात एकीकडे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, तर दुसरीकडे महसूल विभाग आणि विविध शासकीय प्राधिकरणांमधील नियुक्त्यांचे आदेश निघाल्याने प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल सुरू आहेत. जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि महत्त्वाच्या प्राधिकरणांमधील पदांवर नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आगामी काळात प्रशासकीय कामकाजाला कोणती दिशा मिळते, याकडे लक्ष लागले आहे.


