लातूर प्रतिनिधी
जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने संभाव्य पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आतापासूनच काटेकोर नियोजन करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी. जलसाठ्यांचा काटकसरीने वापर करण्याबरोबरच अवैध आणि अनधिकृत पाणी उपशावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पाणीटंचाईसंदर्भातील आढावा बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. उपलब्ध जलसाठा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा, विविध पाणीपुरवठा योजनांची सद्यस्थिती, खरीप पिकांचे संभाव्य नुकसान तसेच जनावरांसाठी चारा उपलब्धतेचे नियोजन याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.
पावसाचे प्रमाण कमी असल्याने आगामी काळात पाणीटंचाईची परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज राहावे, असे भोसले यांनी स्पष्ट केले. ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांना पिण्याचे पाणी नियमितपणे उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असले पाहिजे. ज्या भागात पाणीटंचाईची शक्यता आहे, त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
उपलब्ध जलसाठ्यांचा नियोजनबद्ध आणि काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे भोसले यांनी नमूद केले. पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेल्या जलस्रोतांचा अनधिकृत वापर होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. विशेषतः शेती किंवा अन्य कारणांसाठी नियमबाह्य पद्धतीने होणाऱ्या पाणी उपशावर लक्ष ठेवून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, कमी पावसाचा खरीप हंगामावर होणारा परिणाम आणि संभाव्य पीक नुकसानीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास त्याबाबत आवश्यक पंचनामे आणि पुढील कार्यवाही वेळेत करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने तयारी ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या. पाण्यासोबतच पशुधनासाठी चारा उपलब्ध राहावा, यासाठीही आगाऊ नियोजन करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
लातूर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात पिण्याचे पाणी, शेती आणि पशुधन यांच्यासमोर निर्माण होणारी संभाव्य आव्हाने लक्षात घेऊन प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन आणि नागरिकांना पिण्याचे पाणी प्राधान्याने उपलब्ध करून देणे, या दोन्ही बाबींवर प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रित करावे, असे पालकमंत्री भोसले यांनी बैठकीत स्पष्ट केले.

