मुंबई प्रतिनिधी
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच वरळीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या महिला निषेध मोर्चादरम्यान एक अनपेक्षित प्रसंग घडला. वाहतूक कोंडीमुळे संतप्त झालेल्या एका मुंबईकर महिलेनं थेट राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारत तीव्र शब्दांत सुनावल्याची घटना बुधवारी समोर आली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे.
आंदोलनामुळे सामान्य जनतेचा वेळ आणि इंधन वाया जात असल्याचा मुद्दा या महिलेने आक्रमकपणे मांडला. व्हिडिओमध्ये ती महिला गिरीश महाजन यांच्याशी तीव्र भाषेत वाद घालताना दिसत आहेpic.twitter.com/BOYrZ513Jq https://t.co/rMFCdBOHOX
— Shekhar (@Shekharcoool5) April 21, 2026
वरळी परिसरात भाजपकडून महिलांचा मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर महिला आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याने परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. काही काळासाठी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा फटका बसला.
याच पार्श्वभूमीवर, कोंडीत अडकलेल्या एका उच्चभ्रू महिलेनं संताप व्यक्त करत थेट मोर्चात प्रवेश केला. “तुमचं हे काय सुरू आहे? गेट आऊट फ्रॉम हिअर,” अशा शब्दांत तिनं मंत्र्यांना सुनावत आंदोलनाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सर्वसामान्य नागरिकांचा वेळ आणि इंधन वाया जात असल्याचा मुद्दा तिनं ठामपणे मांडला. उपस्थितांमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, घटनास्थळी तैनात पोलिसांनी संबंधित महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, “माझ्या अंगाला कोणीही हात लावू नये,” असा इशारा देत तिनं पोलिसांनाही सवाल केले. “वाहतूक कोंडी होत असताना तुम्ही नेमकं काय करत आहात?” असा थेट प्रश्न तिनं उपस्थित अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी महिलेला हटवण्याची मागणी केली; मात्र काही वेळाने ती महिला स्वतःहून तेथून निघून गेली.
आंदोलनाचा राजकीय संदर्भ
महिला आरक्षणासंदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याविरोधात राज्यभर आंदोलनांची मालिका हाती घेण्यात आली आहे. वरळीतील हा मोर्चा आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात आयोजित करण्यात आला होता. विरोधक महिला प्रश्नांबाबत असंवेदनशील असल्याचा आरोप करत भाजपकडून जनजागृतीचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे आंदोलनांच्या पद्धतीवर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नागरी अडचणींवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. वाहतूक कोंडी, आपत्कालीन सेवांवरील परिणाम आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडथळे या मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


