मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाला मोठी गती देण्याच्या दिशेने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अंधेरीतील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पानंतर आता वांद्रे (बेहरामपाडा), जोगेश्वरी (मजासवाडी), वडाळा (अँटॉप हिल) आणि शिवाजीनगर-गोवंडी या चार मोठ्या झोपडपट्टी भागांमध्ये समूह क्षेत्र पुनर्विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) योजना राबविण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सुमारे ९७५ एकर क्षेत्राचा कायापालट होणार असून, किमान ८५ हजार झोपडीधारकांना बहुमजली इमारतींमध्ये हक्काची घरे मिळणार आहेत.
एसआरएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित भागांतील झोपड्यांचे सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले असून, चारही प्रकल्पांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही गृहनिर्माण संस्था आणि इमारतीदेखील या योजनेत सहभागी झाल्यास पुनर्विकासाचा विस्तार आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चार मोठ्या प्रकल्पांचा आराखडा तयार
वांद्रे पूर्वेतील बेहरामपाडा परिसरातील सुमारे १५० एकर क्षेत्र क्लस्टर योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या भागात अंदाजे १२ हजार झोपड्या असून, परिसरातील काही जुन्या गृहनिर्माण संस्थांचाही समावेश करण्यात येणार आहे.
जोगेश्वरीतील मजासवाडी हा सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक ठरणार आहे. सुमारे २२५ एकर क्षेत्रात पसरलेल्या या भागात ५१ हजारांहून अधिक झोपड्या असून, त्यासोबतच काही इमारतींचाही पुनर्विकास केला जाणार आहे.
अँटॉप हिल-वडाळा परिसरातील सुमारे ३०० एकर क्षेत्रात तब्बल ६५ हजार झोपड्यांचा समावेश करण्यात येणार असून, हा प्रकल्प मध्य मुंबईतील सर्वात मोठ्या पुनर्विकास योजनांपैकी एक मानला जात आहे.
याशिवाय शिवाजीनगर-गोवंडी परिसरातील ३०० एकर क्षेत्रात सुमारे ५७ हजार झोपड्या आणि काही इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश करण्यात येणार आहे. भविष्यात आणखी सोसायट्या सहभागी झाल्यास पुनर्विकासाचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अंधेरी प्रकल्पाला मंजुरी; लवकरच प्रत्यक्ष काम सुरू
दरम्यान, अंधेरीतील १०१ एकर क्षेत्रावरील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाची निविदा प्रक्रिया यापूर्वीच पूर्ण झाली आहे. या प्रकल्पातून सुमारे २८ हजार घरांची निर्मिती प्रस्तावित असून, शासनाने त्याला मंजुरी दिली आहे. विकासकाकडून देकारपत्र, दोन वर्षांचे एकत्रित भाडे जमा करणे, तिसऱ्या वर्षासाठी पोस्ट-डेटेड चेक (पीडीसी) आणि इतर आवश्यक अटींची पूर्तता झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे.
आधुनिक सुविधा आणि नियोजनबद्ध विकास
एसआरएच्या या क्लस्टर पुनर्विकास योजनेमुळे हजारो कुटुंबांना केवळ पक्की घरेच मिळणार नाहीत, तर आधुनिक पायाभूत सुविधा, रुंद रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था, उद्याने, आरोग्य व शैक्षणिक सुविधा अशा नियोजनबद्ध नागरी विकासाचाही लाभ मिळणार आहे. दीर्घकाळापासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानला जात आहे.
मुंबईतील वाढती लोकसंख्या, झोपडपट्ट्यांचा विस्तार आणि अपुऱ्या नागरी सुविधांच्या पार्श्वभूमीवर एसआरएने हाती घेतलेले हे चार क्लस्टर प्रकल्प ‘झोपडपट्टीमुक्त आणि नियोजनबद्ध मुंबई’ या उद्दिष्टाच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या शहरी विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.


