मुंबई प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर (यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग) प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून, उद्या २३ व २४ एप्रिल रोजी काही तासांसाठी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. द्रुतगती मार्गावरील कि.मी. क्र. 58/500 (डोंगरगाव–कुसगाव परिसर) येथे उभारण्यात आलेल्या पुलाचे शटरिंग काढणे तसेच रंगकामाची कामे हाती घेण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने ही माहिती देण्यात आली आहे. काम सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी दोन्ही दिशेची वाहतूक वेगवेगळ्या दिवशी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे.
उद्या २३ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः बंद राहील. या कालावधीत सर्व वाहने किवळे–देहूरोड–तळेगाव मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८वरून कुसगाव टोल प्लाझाकडे वळविण्यात येतील.
त्यानंतर २४ एप्रिल रोजी त्याच वेळेत (दुपारी १२ ते ३) पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. या दिवशी वाहनांना कुसगाव टोल प्लाझा मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४८वरून देहूरोड–किवळे मार्गे पुण्याकडे वळविण्यात येईल.
या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन आगाऊ करावे, तसेच दिलेल्या वेळेत पर्यायी मार्गांचा वापर करून गैरसोय टाळावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. विशेषतः या वेळेत द्रुतगती मार्गावरील प्रवास टाळता आला, तर वाहतूक कोंडी व विलंबाचा त्रास कमी होऊ शकतो, असेही सूचित करण्यात आले आहे.
दरम्यान, या कालावधीत प्रवास करताना काही अडचण आल्यास वाहनचालकांनी नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाचा ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहतूक व्यवस्थापनासाठी स्थानिक पोलीस व संबंधित यंत्रणा सतर्क ठेवण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


