सातारा प्रतिनिधी
सनई-चौघड्यांच्या मंगल धून अजून कानात घुमत होत्या… हातावरची मेहंदीही फिकी पडली नव्हती… आणि आयुष्यभराच्या सहजीवनाची स्वप्ने नुकतीच आकार घेत होती. पण नियतीने एका क्षणातच या साऱ्या स्वप्नांचा चक्काचूर केला. कराड–चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर येरफळे गावच्या हद्दीत झालेल्या भीषण अपघातात अवघ्या दहा दिवसांपूर्वी विवाहबंधनात अडकलेल्या नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण पाटण तालुका सुन्न झाला आहे.
पाटण तालुक्यातील सडादाढोली येथील राजू झोरे (२५) आणि त्यांची पत्नी राणी झोरे (२३) हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. आयुष्याच्या नव्या वाटेवर हातात हात घालून निघालेल्या या जोडप्याला नियतीने क्रूर वळणावर गाठले. येरफळे गावाजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचे पुढील चाक तुटून दूर फेकले गेले, तर पिकअपच्या काचेचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एका क्षणात दोन जीवच नाही, तर एका कुटुंबाचे भविष्यही उद्ध्वस्त झाले.
दहा दिवसांपूर्वीच या घरातून आनंदात वरात निघाली होती. हसण्याचे, आनंदाचे स्वर घुमत होते. पण आज त्याच घरात शोककळा पसरली आहे. नववधूच्या हातावरची मेहंदी अजून ओसरली नव्हती, आणि नियतीने तिच्या आयुष्याचा दिवाच विझवला. या दुर्दैवी घटनेने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अंत्यदर्शनावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात बेदरकार ओव्हरटेकिंगमुळे घडल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील वाढता वेग, नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि क्षणिक घाई यामुळे निरपराध जीवांचा बळी जात असल्याची ही आणखी एक वेदनादायी नोंद ठरली आहे. पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कराड–चिपळूण मार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षिततेबाबत ठोस उपाययोजनांची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.


