सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील राजकारण तापले असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता दबावाच्या राजकारणावर टीका केली. “कोणीही कितीही दबाव टाकू द्या, मात्र कार्यकर्त्यांनी घाबरू नये आणि निर्धाराने लढा द्यावा,” असे आवाहन त्यांनी गांधी मैदानावरील सभेत केले.
या सभेला उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. सभेदरम्यान विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीतील घडामोडींवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “सातारा ही शूरवीरांची भूमी असून स्वाभिमान जपणारे शहर आहे. येथे खालच्या पातळीवरचे राजकारण झाले, ही दुर्दैवी बाब आहे.” सातारा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र “आता वेगळीच काँग्रेस निर्माण झाली आहे,” असा टोला त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लगावला.
“नाव कमावण्यासाठी वर्षानुवर्षे मेहनत घ्यावी लागते, पण ते गमावायला वेळ लागत नाही. संपत्तीपेक्षा माणसांचे प्रेम महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन केले. “लोकांच्या मनातील जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचाच आहे,” असा दावा त्यांनी केला.
राजकीय परंपरेचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले, “मी कोणाच्या वाटेला जात नाही; पण कोणी छेडले तर सोडत नाही, हा माझा स्वभाव आहे.” राज्यभरात शिवसेनेची वाढ होत असल्याचा दावा करत त्यांनी “गाव तिथे शिवसैनिक” अभियान अधिक जोमाने राबवण्याचे निर्देश दिले.
यावेळी उदय सामंत यांनी साताऱ्यात आयटी पार्कला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती दिली, तर फलटण येथे एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले. शंभूराज देसाई यांनी महायुतीतून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न झाला; मात्र त्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करत जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा मांडला.
सभेला मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते.


