मुंबई. प्रतिनिधी
महानगरातील वाढत्या उंच इमारती, अरुंद रस्ते आणि बदलत्या आपत्कालीन परिस्थितींच्या पार्श्वभूमीवर मुंबई अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये संख्यात्मक तसेच गुणात्मक वाढ करण्यात येणार असल्याची ग्वाही महापौर रितू तावडे यांनी दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अग्निप्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती यावर अधिक भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
भायखळा येथील मुख्यालयात शनिवारी आयोजित वार्षिक अग्निकवायत स्पर्धा २०२६ च्या अंतिम फेरीत त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या. यावेळी राज्य अग्निशमन सेवा संचालक संतोष वारीक, प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र अंबुलगेकर यांची उपस्थिती होती.
समारंभाच्या प्रारंभी १४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात ‘फोर्ट स्टिकीन’ जहाजाला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या ६६ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्मृतीस्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून महापौरांनी अभिवादन केले, तर अग्निशमन दलाच्या पथकाने मानवंदना दिली.
महापौर तावडे म्हणाल्या, “मुंबई कधीच झोपत नाही, असे म्हटले जाते; मात्र नागरिक निर्धास्त झोप घेऊ शकतात, कारण अग्निशमन दल सतत सज्ज असते. १८६५ पासूनची ही सेवा बलिदान आणि कर्तव्यनिष्ठेच्या परंपरेने समृद्ध आहे.” उंच इमारती, धुरामुळे निर्माण होणारे संकट आणि गर्दीच्या भागातील आव्हाने यांचा सामना करत दल नागरिकांचे प्राण वाचवत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘फायर फायटिंग’बरोबरच ‘लाइफ सेव्हिंग’ या संकल्पनेवर दल अधिक भर देत असून अत्याधुनिक साधनसामग्रीचा वापर वाढविण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही आग प्रतिबंधासाठी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले. फायर ऑडिट, गॅस गळतीबाबत दक्षता आणि सुरक्षाविषयक नियमांचे पालन आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
महापालिकेच्या विकास आराखडा २०३४ अंतर्गत नव्या अग्निशमन केंद्रांची उभारणी केली जात असून, ‘फायर रॅली’सारख्या उपक्रमांद्वारे जनजागृती वाढविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, स्पर्धेच्या अंतिम फेरीत विविध अग्निशमन केंद्रांच्या संघांनी कौशल्यपूर्ण आणि वेगवान प्रात्यक्षिके सादर केली. कमी वेळेत अचूक नियोजन करून ड्रिल पूर्ण करण्यासाठी प्रत्येक संघाने प्रभावी कामगिरी केली. उपस्थितांकडून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.
स्पर्धेतील प्रमुख निकाल :
• सर्वोत्कृष्ट संघ : फोर्ट अग्निशमन केंद्र
• उत्कृष्ट फायरमन : यंत्रचालक नितीन तुकाराम जाधव
फायर पंप ड्रिल स्पर्धा :
मुलुंड (प्रथम), बीकेसी (द्वितीय), मेमनवाडा (तृतीय), कुर्ला (चौथा), फोर्ट (पाचवा)
महिला गट :
फोर्ट (प्रथम), विक्रोळी (द्वितीय)
ट्रिपल एक्सटेन्शन लॅडर मोटर पंप ड्रिल :
फोर्ट (प्रथम), भायखळा (द्वितीय), मरोळ (तृतीय), कांदिवली (चौथा)
स्पर्धेनंतर विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्रे आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात आली. विजयानंतर ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
परंपरेतून घडणारे प्रशिक्षण
१९४८ पासून सुरू असलेली ही अग्निकवायत स्पर्धा केवळ स्पर्धा नसून जवानांच्या शारीरिक क्षमता, धैर्य, तत्परता आणि संघभावनेची कसोटी मानली जाते. शिडी चढणे, होज जोडणी, पाण्याचा अचूक वापर, बचावकार्य आणि समन्वय यांचा कस लावणाऱ्या या स्पर्धांमुळे आपत्कालीन परिस्थितीत जलद व शिस्तबद्ध प्रतिसाद देण्याची तयारी अधिक बळकट होत असल्याचे अधोरेखित झाले.


