मुंबई प्रतिनिधी
राज्यात पुढील काही दिवसांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असून २० ते २२ एप्रिल या कालावधीत दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसर, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत ढगाळ वातावरण तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, १९ एप्रिल रोजीच या बदलांची सुरुवात होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा, उत्तर खानदेश तसेच दक्षिण मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर २० आणि २१ एप्रिल रोजी या पावसाचा विस्तार वाढून पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभागासह मराठवाड्याचा दक्षिण भाग आणि अमरावती विभागातील विदर्भातील जिल्ह्यांमध्येही पावसाच्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
या काळात काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढून विजांचा कडकडाट होण्याबरोबरच गारपीट होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी पावसाचे क्षेत्र आणि तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, अचानक होणाऱ्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवावीत, शेतमालावर ताडपत्री किंवा झाकणाचा वापर करावा, तसेच भाजीपाला व इतर कृषी उत्पादने उघड्यावर न ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांमुळे आणि संभाव्य गारपीटीमुळे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अचानक होणाऱ्या या हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असली तरी विजांच्या कडकडाटासह येणाऱ्या पावसामुळे धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही अनावश्यक बाहेर पडणे टाळावे व सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


