मुंबई प्रतिनिधी
मुंबई: अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खरेदीसाठी आणि फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना उद्या रेल्वे प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी (१९ एप्रिल) मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. रुळांची देखभाल आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी हे काम हाती घेण्यात येणार असल्याने अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या विलंबाने धावतील.
हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल/बेलापूर दरम्यान सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत डाऊन मार्गावरील सेवा, तर सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत अप मार्गावरील सेवा बंद राहतील. ट्रान्स हार्बर मार्गावरही ठाणे ते पनवेल दरम्यान सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वाहतूक पूर्णपणे बंद असेल. प्रवाशांची सोय म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार असल्या, तरी पनवेलच्या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगाव दरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच तासांचा ‘जम्बो ब्लॉक’ घेण्यात येणार आहे. या काळात जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवल्या जातील. परिणामी, पश्चिम रेल्वेच्या फेऱ्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावतील. सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचा होणारा खोळंबा टाळण्यासाठी रेल्वेने प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.


