अमरावती प्रतिनिधी
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेने नागरिकांना अक्षरशः हैराण केले असून अमरावती आणि वर्धा जिल्हे राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्वाधिक तापमान नोंदवणाऱ्या शहरांमध्ये अव्वल ठरले आहेत. शुक्रवारी या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. परिणामी, ही शहरे ‘हॉट अँड टॉप’ ठरल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
विदर्भातील उष्णतेची तीव्रता यावरून स्पष्ट होते की, देशातील सर्वाधिक तापमान नोंदवलेल्या पहिल्या पाच शहरांपैकी चार शहरे विदर्भातीलच आहेत. अकोला येथे ४४.१ अंश, तर नागपूर आणि वाशिम येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली. छत्तीसगडमधील राजनांदगाव वगळता उर्वरित सर्व ‘टॉप’ शहरांमध्ये विदर्भाचा समावेश असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होते.
दरम्यान, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यासाठी १९ एप्रिलपर्यंत ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामानातील बदलांची कारणमीमांसा
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर भारतात सध्या सक्रिय असलेल्या पश्चिमी विक्षोभाचा परिणाम देशभरातील हवामानावर होत आहे. त्यातच हिमालयाकडे आणखी एक विक्षोभ सरकत आहे. भूमध्य समुद्र परिसर, हरियाणा, बांगलादेश, ईशान्य मध्य प्रदेश आणि कर्नाटक या भागांत निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे वातावरण अधिक अस्थिर झाले आहे.
याशिवाय विदर्भ ते मन्नारच्या आखातापर्यंत सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या द्रोणीय रेषेमुळे उष्णतेची लाट अधिक तीव्र बनली आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून विदर्भात तापमान झपाट्याने वाढले आहे.
२० एप्रिलपर्यंत उष्णतेचा जोर कायम
सध्याची स्थिती लक्षात घेता, विदर्भात २० एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
मात्र, १९ एप्रिलपासून वातावरणात ढगाळपणा वाढण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात काहीशी घट होण्याची चिन्हे आहेत.
पावसाची शक्यता; दिलासा मिळण्याची अपेक्षा
२० ते २२ एप्रिल दरम्यान पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे विदर्भात ढगाळ वातावरण तयार होऊन काही ठिकाणी गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे कडक उन्हापासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उष्माघाताचा वाढता धोका
तापमानातील झपाट्याने वाढ झाल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून नागरिक उकाड्यामुळे त्रस्त झाले आहेत.
चक्कर येणे, मळमळ, तीव्र डोकेदुखी आणि शरीराचे तापमान अचानक वाढणे ही उष्माघाताची प्रमुख लक्षणे मानली जातात. अशा लक्षणांची जाणीव होताच संबंधित व्यक्तीला तातडीने सावलीत नेऊन थंड पाण्याने शरीर पुसावे आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
प्रशासनाकडून नागरिकांना दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुरेसे पाणी पिणे, हलका व पचण्यास सोपा आहार घेणे, तसेच डोक्यावर टोपी किंवा ओढणीचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.
विदर्भातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, पावसाच्या शक्यतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


