अमरावती प्रतिनिधी
अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गुरुवारी सकाळी शीघ्र कृती दलाच्या (क्युआरटी) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. विजय नागापुरे असे मृत जवानाचे नाव असून, या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पोलीस आयुक्तालय परिसरातील क्युआरटी कार्यालयातच विजय नागापुरे यांनी शासकीय शस्त्रातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील कर्मचारी आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी धावले; मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त राकेश ओला, उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आयुक्तालयाच्या इमारतीतच ही घटना घडल्याने पोलीस दलात तसेच आयुक्तालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कर्तव्यावर असताना विजय नागापुरे यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सुरू असून, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.


