मुंबई, प्रतिनिधी
राज्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना, मुंबईत पाणीटंचाईचे सावट गडद होत असल्याचे चित्र आहे. जलाशयांमधील घटती पाणीपातळी आणि पावसाळा उशिरा येण्याची शक्यता लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेकडून १ मेपासून शहरात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. या संदर्भातील अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवण्यात आला असून, लवकरच अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये सध्या केवळ ३३.६० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा सध्याच्या वापरानुसार जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, भारतीय हवामान विभागाने यंदा मान्सून उशिरा दाखल होण्याची शक्यता वर्तविल्याने प्रशासनासमोर ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून, साठा झपाट्याने घटत आहे. या पार्श्वभूमीवर पाणी वापरावर नियंत्रण ठेवणे अपरिहार्य बनले आहे. महापालिकेच्या नियोजनानुसार, १० टक्के कपात लागू केल्यास उपलब्ध साठा अधिक काळ टिकवून ठेवता येईल आणि पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीपुरवठा अबाधित ठेवणे शक्य होईल.
मुंबईला दररोज सुमारे ४,१०० दशलक्ष लिटर पाणी सात धरणांमधून पुरवले जाते. यामध्ये तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या जलस्रोतांचा समावेश आहे. १५ एप्रिल २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, भातसा धरणामध्ये सर्वाधिक पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे.
धरणांमधील साठ्याची सद्यस्थिती (दशलक्ष लिटरमध्ये):
भातसा – २,३५,४३९
अप्पर वैतरणा – ७७,०४५
मध्य वैतरणा – ६९,१०६
मोडक सागर – ४५,३४०
तानसा – ४०,८१७
विहार – १५,३५३
तुळशी – ३,२७४
दरम्यान, राज्य सरकारने महापालिकेला जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, कपातीचा निर्णय तातडीने घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अधिकृत निर्णय अद्याप जाहीर झालेला नसला, तरी संभाव्य कपातीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक पाणी वापर टाळणे, गळती रोखणे आणि पुनर्वापरावर भर देणे, या उपाययोजनांद्वारे नागरिकांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पाणीटंचाईच्या संभाव्य संकटाला सामोरे जाताना प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. आगामी काही आठवडे पाण्याच्या वापरातील शिस्तच शहराला मोठ्या अडचणीतून बाहेर काढू शकते, असे संकेत या घडामोडींमधून मिळत आहेत.


