मुंबई प्रतिनिधी
वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरात मेट्रो बांधकामादरम्यान पहाटेच्या सुमारास ४०० टन वजनाची मोबाइल क्रेन उलटल्याची धक्कादायक घटना बुधवारी घडली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या मेट्रो २ बी प्रकल्पाच्या कामावेळी हा अपघात घडला असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही तास परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली.
एमएमआरडीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे साडेचारच्या सुमारास एशियन हार्ट हॉस्पिटल जंक्शन जवळ प्री-कास्ट गर्डर बसवण्याचे काम सुरू होते. यावेळी प्री-कास्ट बीम उचलत असताना क्रेनमध्ये अचानक यांत्रिक बिघाड झाला आणि नियंत्रण सुटल्याने ती उलटली. क्रेन उलटताच त्यावरील बीमही जमिनीवर कोसळला. सुरुवातीला बीम कोसळल्याने अपघात झाल्याची चर्चा होती; मात्र एमएमआरडीएकडून हा दावा फेटाळण्यात आला असून, प्राथमिक कारण यांत्रिक बिघाड असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अपघातानंतर तत्काळ घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले. रस्त्यावर आडवी पडलेली क्रेन आणि इतर उपकरणे हटवण्यासाठी ६०० टन क्षमतेची दुसरी क्रेन मागवण्यात आली. तसेच, वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. बीकेसीतील प्रमुख मार्ग काही काळ बंद ठेवावा लागल्याने सकाळच्या वाहतुकीवर परिणाम झाला.
मुंबईत सध्या विविध मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असल्याने अशा प्रकारची जड यंत्रसामग्री रात्रीच्या वेळेत वापरली जाते. नागरिकांना दिवसा अडथळा होऊ नये, यासाठी ही कामे प्रामुख्याने मध्यरात्री ते पहाटेच्या वेळेत केली जातात. मात्र, या कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांचे पालन कितपत काटेकोरपणे केले जाते, याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या प्रकल्पाचे कंत्राट जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड या कंपनीकडे असून, तिच्या कामकाजावर यापूर्वीही टीका झाली आहे. बीकेसी परिसरातीलच एका उड्डाणपुलाच्या कामादरम्यान पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती, ज्यात काही जण जखमी झाले होते. त्या वेळी संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती.
तसेच, दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ प्रकल्पादरम्यानही या कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सातहून अधिक अपघात घडल्याची नोंद आहे. या घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे संबंधित कंपनीच्या सुरक्षाविषयक धोरणांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर, बीकेसीतील ताज्या घटनेनंतर कंत्राटदारांवर अधिक कठोर नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या वेगासोबतच कामगार आणि नागरिकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्याने सुनिश्चित करण्याची जबाबदारी प्रशासनासमोर पुन्हा अधोरेखित झाली आहे.


