मुंबई प्रतिनिधी
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) संचलित केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न शाळांच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही उल्लेखनीय यशाची परंपरा कायम राहिली आहे. महानगरपालिकेच्या ११ सीबीएसई शाळांचा एकत्रित निकाल ९२.८९ टक्के इतका लागला असून, शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने होत असलेली प्रगती या निकालातून अधोरेखित झाली आहे.
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या या शाळांमधून यंदा एकूण ३३९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होत यश संपादन केले. विशेष म्हणजे, चार शाळांनी १०० टक्के निकालाची नोंद करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.
यंदाच्या निकालात मिठागर सीबीएसई शाळेतील कुमारी आर्या लामणे हिने ९७.८ टक्के गुण मिळवत महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ पुनम नगर शाळेतील सौरभ यादव (९७.२ टक्के) आणि राजावाडी शाळेतील कौस्तुभ त्रिपाठी (९७ टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. याशिवाय पुनम नगर शाळेतील आर्यन मयेकर (९६.६ टक्के) व श्रेया सिंग (९६.४ टक्के), तसेच मिठा नगर शाळेतील माही सोळंकी (९६.२ टक्के) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
दरम्यान, भवानी शंकर रोड (दादर), राजावाडी (घाटकोपर), मिठा नगर (मुलुंड) आणि पुनम नगर (अंधेरी) या चार शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवून विशेष कामगिरी बजावली आहे.
निकालाच्या विश्लेषणातून गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी लक्षणीय प्रगती केल्याचे दिसून आले. काही विद्यार्थ्यांनी मराठी विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य यांचे हे एकत्रित फलित असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले.
दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, आयुक्त अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे तसेच उपआयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


