मुंबई प्रतिनिधी
गोरेगाव पूर्व येथील नेस्को संकुलात झालेल्या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज वनराई पोलिस ठाणे येथे जोरदार आंदोलन करण्यात आले. संबंधित घटनेला जबाबदार असलेल्या आयोजक व पुरवठादारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून तरुणांमध्ये वाढत चाललेला अंमली पदार्थांचा वापर, तसेच अशा कार्यक्रमांतील सुरक्षेतील त्रुटी यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त करत, अशा कार्यक्रमांवर प्रभावी देखरेख ठेवण्यात अपयश आल्याचा आरोप केला.
या आंदोलनात शिवसेना नेते व विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभू, मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार बाळा नर, युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू, माजी उपमहापौर सुहास वाडकर यांच्यासह अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी ‘दोषींना तात्काळ अटक करा’, ‘कॉन्सर्टमधील ड्रग्स रॅकेटचा पर्दाफाश करा’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. पोलिसांनी घटनेची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले असले तरी, दोषींवर तातडीने कडक कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
दरम्यान, या घटनेमुळे शहरातील मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी असलेल्या नियमावलींच्या अंमलबजावणीवर आणि तरुणांच्या सुरक्षिततेवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुंबई पोलिसांनी अशा कार्यक्रमांवर अधिक कडक नजर ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे.


