मुंबई प्रतिनिधी
मध्य रेल्वेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात विनातिकीट व अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करत तब्बल ४१.९० लाख प्रवाशांची धरपकड केली आहे. या कारवाईतून २५१.९१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, मागील वर्षाच्या तुलनेत कारवाईत आणि दंड वसुलीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
२०२४-२५ मध्ये ३८.०५ लाख विनातिकीट प्रवासी पकडले गेले होते. यंदा ही संख्या सुमारे १० टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे दंड वसुलीतही मोठी झेप घेतली असून, मागील वर्षीच्या २०३.७० कोटी रुपयांच्या तुलनेत यंदा २४ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.
रेल्वे प्रशासनाच्या मते, प्रवाशांना सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी विनातिकीट प्रवाशांविरुद्ध सातत्याने विशेष तपासणी मोहीमा राबवण्यात आल्या. पद्धतशीर तपासणी आणि आकस्मिक छापे यामुळे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्रवासावर आळा बसवणे शक्य झाले.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांमध्ये विनातिकीट प्रवासाचे प्रमाण अधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. या गाड्यांमध्ये २९.२७ लाख प्रवाशांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून २१३.३१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. उपनगरीय लोकल सेवेत १२.६३ लाख प्रवाशांवर कारवाई करत ३८.८६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली.
वातानुकूलित लोकलमध्येही वाढती प्रकरणे
मध्य रेल्वेच्या वातानुकूलित लोकल सेवेतही विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. २०२५-२६ मध्ये अशा १.२३ लाख प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ही संख्या मागील वर्षाच्या ९८,६८१ प्रकरणांच्या तुलनेत २५ टक्क्यांनी अधिक आहे. या कारवाईतून ३.८९ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, त्यातही २० टक्क्यांची वाढ झाली आहे.
मार्च महिन्यातही कारवाईचा जोर
मार्च २०२६ मध्ये ३.९१ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. मार्च २०२५ मधील ३.४४ लाखांच्या तुलनेत यात १४ टक्क्यांची वाढ झाली आहे. या कालावधीत २४.८८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, जो मागील वर्षाच्या १८.०८ कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल ३८ टक्क्यांनी अधिक आहे.
विभागनिहाय कारवाई
मध्य रेल्वेच्या विविध विभागांतही विनातिकीट प्रवाशांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. मुंबई विभाग आघाडीवर राहिला असून, येथे १७.९७ लाख प्रकरणांमधून ८०.९८ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. भुसावळ विभागातून ९.६३ लाख प्रकरणांतून ८१.२८ कोटी रुपये वसूल झाले. पुणे विभागात ४.७३ लाख प्रकरणांतून ३०.१५ कोटी, नागपूर विभागात ४.५४ लाख प्रकरणांतून २८.३६ कोटी, तर सोलापूर विभागात २.५३ लाख प्रकरणांतून ११.६२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. मुख्यालय पातळीवर २.४८ लाख प्रकरणांतून १९.५१ कोटी रुपये जमा झाले.
रेल्वे प्रशासनाने विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी पुढील काळातही तपासणी मोहिमा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला असून, प्रवाशांनी वैध तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


