मुंबई प्रतिनिधी
राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या (एसबीटीसी) नियमांचे पालन करण्यात मुंबईतील अनेक सरकारी रक्तपेढ्या अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे. रक्तसाठ्याची दैनंदिन माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध न केल्याप्रकरणी मागील तीन वर्षांत विविध रक्तपेढ्यांवर एकूण २ लाख ५१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, त्यापैकी बहुतांश रक्कम अद्याप वसूल झालेली नाही.
एसबीटीसीच्या नियमानुसार प्रत्येक रक्तपेढीने दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती संकेतस्थळावर अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास संबंधित रक्तपेढीवर प्रतिदिन एक हजार रुपयांचा दंड आकारला जातो. नागरिकांना तातडीच्या गरजेत रक्त सहज उपलब्ध व्हावे, यासाठी ही यंत्रणा राबविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक रक्तपेढ्यांकडून या नियमाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
मुंबईतील कूपर, जे.जे. महानगर, रेडक्रॉस, शीव, सेंट जॉर्जेस, कामा आणि भाभा रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांचा दंड आकारण्यात आलेल्या यादीत समावेश आहे. यापैकी केवळ २१ हजार रुपयांची रक्कम भरली गेली असून, तब्बल २ लाख ३० हजार रुपये दंड प्रलंबित आहेत.
कूपर, जे.जे. आघाडीवर
दंडाच्या संख्येनुसार कूपर रुग्णालयातील रक्तपेढीला सर्वाधिक २७ वेळा दंड ठोठावण्यात आला असून, त्यांनी अद्याप एकदाही दंड भरलेला नाही. त्यापाठोपाठ जे.जे. महानगर रक्तपेढीला २६ वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यांनी केवळ एकदाच दंड भरला आहे. रेडक्रॉस रक्तपेढीवर २५ वेळा दंड आकारण्यात आला असून, या संस्थेनेही अद्याप रक्कम भरलेली नाही. सेंट जॉर्जेस व भाभा रुग्णालयांना प्रत्येकी २१ वेळा, तर शीव रुग्णालयाला २० वेळा दंड ठोठावण्यात आला आहे.
काहींचे पालन समाधानकारक
याउलट, काही रक्तपेढ्यांनी नियमांचे तुलनेने चांगले पालन केले आहे. जी.टी. रुग्णालयाला पाच वेळा दंड आकारण्यात आला असून, त्यातील एक दंड भरला आहे. राजावाडी रुग्णालयाने चारपैकी दोन दंड भरले आहेत. व्ही.एन. देसाई, टाटा आणि जगजीवन रक्तपेढ्यांना मर्यादित वेळा दंड ठोठावण्यात आला आहे. नायर रुग्णालयाने मात्र सर्व आठ वेळचा दंड भरून नियमपालनाची नोंद केली आहे.
परवाना नूतनीकरणावेळी वसुली
“रक्तपेढ्यांकडून दंड तत्काळ भरला जात नसला, तरी परवाना नूतनीकरणाच्या प्रक्रियेदरम्यान संबंधित रक्कम वसूल केली जाते. दंड न भरल्यास परवाना नूतनीकरण रोखले जाते,” अशी माहिती एसबीटीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, रक्तसाठ्याची अचूक व वेळेवर माहिती उपलब्ध न झाल्यास रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.


