नवी दिल्ली प्रतिनिधी
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राजधानीत विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस विशेष आयुक्त श्वेता सिंघल यांनी पुष्पांजली अर्पण केली.
यानंतर नवीन महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून उपस्थितांनी आदरांजली वाहिली. यावेळी माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे व स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी आंबेडकरांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. राजधानीतील या अभिवादन कार्यक्रमातून त्यांच्या विचारांची पुनःप्रत्ययाची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आली.


