नवी दिल्ली:
बाजारात सुट्ट्या पैशांची कमतरता आणि एटीएममधून प्रामुख्याने मोठ्या मूल्याच्या नोटाच मिळत असल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत छोट्या मूल्याच्या नोटा एटीएममधून उपलब्ध करून देण्यासाठी पायलट प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारचे अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. बाजारात १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटांची कमतरता असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावत या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात असल्याचे स्पष्ट केले. मात्र नागरिकांना या नोटा सहज उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारकडून विशेष व्यवस्था करण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या बहुतांश एटीएममधून १००, २०० किंवा त्यापेक्षा मोठ्या मूल्याच्या नोटाच दिल्या जातात. लहान मूल्याच्या नोटा वितरित करण्यासाठी नियमित एटीएम यंत्रणा सक्षम नसल्याने “स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सर” या स्वतंत्र यंत्राद्वारे छोट्या नोटा देण्याचा प्रयोग सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत काही एटीएम केंद्रांमध्ये स्वतंत्र मशीन बसवण्यात येणार असून त्यातून १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा नागरिकांना काढता येतील.
हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यास पुढील टप्प्यात देशभरातील एटीएम केंद्रांमध्ये अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे. त्यामुळे किरकोळ व्यवहारांसाठी सुट्ट्या पैशांची समस्या कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सरकारी आकडेवारीनुसार चालू आर्थिक वर्षात २६ फेब्रुवारीपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १० रुपयांच्या ४३९.४० कोटी, २० रुपयांच्या १९३.७० कोटी आणि ५० रुपयांच्या १३०.३० कोटी नोटा चलनात आणल्या आहेत. याआधीच्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) १० रुपयांच्या १८० कोटी, २० रुपयांच्या १५० कोटी आणि ५० रुपयांच्या ३०० कोटी नोटा बाजारात वितरित करण्यात आल्या होत्या.


