मुंबई प्रतिनिधी
राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले असून ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपातळीवर सत्तेची चुरस रंगणार आहे. तब्बल ३५९१ जागांसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने गावागावात निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे.
राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यात ४७१ थेट सरपंच पदांसाठी तर ३१२० सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली असून प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.
दरम्यान, राज्याचं लक्ष सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीकडे लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी निवडणूक होत असून सुनेत्रा पवार या रिंगणात उतरल्या आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच काँग्रेससह इतर पक्षांनी उमेदवार उभे केल्याने लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. बारामती आणि राहुरी येथे २३ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
गावागावात राजकीय हालचालींना वेग
ग्रामपंचायत निवडणुकांच्या घोषणेनंतर ग्रामीण भागात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी धावपळ सुरू केली असून गावपातळीवर बैठका, प्रचार नियोजन आणि गटबाजीचे राजकारण रंगू लागले आहे. अनेक गावांमध्ये पारंपरिक गटांमध्ये सरळ लढती अपेक्षित असून काही ठिकाणी बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्नही सुरू आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून ग्रामपंचायत निवडणुकांची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांमध्येही उत्सुकता दिसून येत आहे. स्थानिक विकास, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, शासकीय योजना या मुद्द्यांवर यावेळी निवडणुका रंगण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या तारखा एक नजर
* नामनिर्देशन अर्जाची शेवटची तारीख: १३ एप्रिल २०२६
* अर्जांची छाननी: १५ एप्रिल २०२६
* माघार घेण्याची अंतिम मुदत: १७ एप्रिल २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
* मतदान: २८ एप्रिल २०२६ (सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३०)
* मतमोजणी: २९ एप्रिल २०२६
नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे.
प्रशासन सज्ज, सुरक्षा कडक
निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पडाव्यात यासाठी प्रशासन सज्ज झाले असून पोलिस यंत्रणाही अलर्ट मोडवर आहे. संवेदनशील गावांमध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणुका या केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नसून ग्रामीण राजकारणाचा पाया ठरतात. त्यामुळेच या निवडणुकांकडे राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांचेही बारकाईने लक्ष लागले आहे.
आता २८ एप्रिलला मतदार कोणाला कौल देणार आणि गावाच्या सत्तेची धुरा कोणाच्या हाती देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.


