मुंबई प्रतिनिधी
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी मुंबईत निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालय येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टी, विशेषतः हिंदी व मराठी संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, एका अजरामर युगाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
अखेरचा प्रवास आणि अंत्यसंस्कार
आशा भोसले यांना छातीत संसर्ग झाल्याने शनिवारी उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांच्या प्रकृतीत सातत्याने बिघाड होत गेला आणि अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी अधिकृतपणे निधनाची माहिती दिली.
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत मुंबईतील लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शोक
या निधनावर राज्यातील विविध मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात आला आहे. आशिष शेलार यांनी “एका युगाचा अंत झाला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. “आशाताईंचं असणं हे समाधान देणारं होतं. दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देण्याची ताकद त्यांच्या कलेत होती,” असे ते म्हणाले.
संगीतविश्वातील अद्वितीय प्रवास
सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले यांनी अवघ्या दहाव्या वर्षी गायनाला सुरुवात केली. तब्बल आठ दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांच्या नावाची नोंद सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून गिनीज बुकमध्ये झाली आहे.
त्यांच्या आवाजाची बहुविधता, शैलीतील प्रयोगशीलता आणि काळानुरूप स्वतःला सतत बदलण्याची क्षमता यामुळे त्या पिढ्यान्पिढ्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिल्या. शास्त्रीय, गझल, पॉप, कॅबरे ते लोकसंगीत,प्रत्येक प्रकारात त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली.
नव्वदीनंतरही सक्रियता
वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही त्यांचा उत्साह लक्षणीय होता. २०२३ मध्ये दुबई येथे त्यांनी जाहीर कार्यक्रम सादर करून आपला ९०वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचबरोबर देशभरातील विविध कार्यक्रमांत सहभाग घेत त्यांनी आपल्या कलेची जादू कायम ठेवली.
मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमातही त्यांनी शुद्ध मराठी वापराच्या गरजेवर भर दिला होता. गेल्या काही महिन्यांत मात्र त्या सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होत्या.
अविस्मरणीय वारसा
आशा भोसले यांचा आवाज हा केवळ गाण्यांपुरता मर्यादित नव्हता; तो भारतीय सांस्कृतिक भावविश्वाचा अविभाज्य भाग बनला होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे. मात्र त्यांनी दिलेली अमर गाणी आणि समृद्ध संगीतवारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.


