मुंबई प्रतिनिधी
उन्हाळी सुट्यांच्या तोंडावर राज्यातील एसटी प्रवाशांना मोठा आर्थिक झटका बसणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने १५ एप्रिलपासून तिकीटदरात सुमारे १० टक्क्यांची हंगामी वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला असून, ही दरवाढ १५ जूनपर्यंत कायम राहणार आहे. वाढत्या प्रवासी गर्दीचा ताण, इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च यामुळे अतिरिक्त महसूल उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या दरवाढीचा सर्वाधिक फटका कोकणातून मुंबई, ठाणे आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसणार आहे. रत्नागिरी–मुंबई प्रवास ६२ रुपयांनी महागला असून तिकीटदर ६६६ रुपयांवर पोहोचला आहे, तर बोरिवलीसाठी ६५ रुपयांची वाढ झाली आहे. ठाणे मार्गावर ६० रुपये, पुणे (स्वारगेट) मार्गावर ५४ रुपये आणि पिंपरी-चिंचवड मार्गावर ५७ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. राजापूर, लांजा, गुहागर, दापोली, चिपळूण, संगमेश्वर आदी भागांतूनही मुंबई, बोरिवली आणि पुण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला ३६ ते ७३ रुपयांपर्यंतचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे.
ही दरवाढ मुख्यतः साधी (लालपरी), जलद आणि सामान्य बससेवांसाठी लागू राहणार आहे. शिवनेरी, शिवशाही, एसी व ई-बससेवांना या वाढीतून वगळण्यात आले असून, या बससेवांच्या तिकीटदरात केवळ नाममात्र वाढ करण्यात आली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर शासकीय सवलती मात्र पूर्ववतच सुरू राहणार असल्याने नियमित प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
उन्हाळी हंगामात एसटी बस ही ग्रामीण व निमशहरी भागांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, या हंगामी भाडेवाढीमुळे गावी जाणाऱ्या आणि पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तात्पुरती असली तरी ही वाढ सर्वसामान्यांच्या खिशाला चटका लावणारी ठरणार, हे मात्र निश्चित.


