मुंबई प्रतिनिधी
घाटकोपर (पूर्व) येथील राजावाडी रुग्णालय पुनर्विकासाच्या कामाला गती देण्याचे निर्देश देत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पहिल्या टप्प्यातील इमारत उभारणीचे प्रत्यक्ष काम पुढील आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत सुरू करावे, असे स्पष्ट आदेश दिले. रुग्णालयावर असलेला वाढता रुग्णसेवेचा भार लक्षात घेता पुनर्विकासाचे काम रखडणे परवडणारे नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
घाटकोपर (पूर्व) येथील सेठ व्ही.सी. गांधी आणि एम. ए. व्होरा महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय अर्थात राजावाडी रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पाची महापौर तावडे यांनी गुरुवारी (२ एप्रिल २०२६) प्रत्यक्ष स्थळावर जाऊन पाहणी केली.
या पाहणीवेळी नगरसेवक धर्मेश गिरी, राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजूलवाला, रुग्णालये पायाभूत सुविधा कक्षाचे उपप्रमुख अभियंता मनोज राणे, एन विभागाचे सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) मारुती पवार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
उपप्रमुख अभियंता मनोज राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे ६०० रुग्णशय्या क्षमतेची अत्याधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे. ही इमारत निम्न तळघर, तळघर, तळमजला आणि त्यावर १० मजले अशा स्वरूपाची असेल. सुमारे ३३ हजार १७९ चौरस मीटर इतक्या क्षेत्रफळावर हे बांधकाम होणार असून इमारतीत सर्व आधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील.
या प्रकल्पाचे डिसेंबर २०२५ मध्ये भूमिपूजन झाले असून गौण खनिज व राडारोडा संदर्भातील परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील इमारत पूर्ण झाल्यानंतर सध्याचे संपूर्ण रुग्णालय त्या इमारतीत स्थलांतरित करण्यात येणार असून त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुढील इमारत उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, भूमिपूजन होऊन चार महिने उलटल्यानंतरही प्रत्यक्ष बांधकाम सुरू न झाल्याबद्दल महापौर तावडे यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाला अडचणी असल्यास त्या त्वरित वरिष्ठांच्या निदर्शनास आणाव्यात आणि लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे, असे त्यांनी सांगितले. आवश्यक सर्व परवानग्या मिळवणे हे कंत्राटदाराचे काम असून त्यासाठी कामाला विलंब होणे सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बांधकाम सुरू असताना शेजारील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना आवाज, धूळ किंवा इतर अडचणी होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. तसेच प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती घाटकोपर परिसरातील सर्व नगरसेवकांना देत राहावी आणि या पुनर्विकास प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत करावे, असेही त्यांनी निर्देशित केले.


