मुंबई प्रतिनिधी
खेरवाडी (वांद्रे पूर्व) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मान्सूनपूर्व कामांना वेग देण्यात येत असताना वांद्रे (पूर्व) परिसरातील खेरवाडी भागातही नाले व गटार सफाईच्या कामांना गती मिळाली आहे. वार्ड क्रमांक ९५ मधील नवनिर्वाचित नगरसेवक हरी शास्त्री यांनी या कामांवर स्वतः लक्ष केंद्रित करत परिसराची पाहणी केली.
खेरवाडी परिसरातील खाटीकवाडी तसेच दायमा रोड परिसरात अनेक वर्षांपासून पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत असतात. या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या मान्सूनपूर्व नाले-गटार सफाई मोहिमेला सध्या वेग देण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडून यंत्रसामग्रीच्या सहाय्याने गटारातील गाळ काढण्याचे आणि नाल्यांची स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
उबाठा पक्षाचे नगरसेवक हरी शास्त्री यांनी आज प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. पावसाळ्यापूर्वी सर्व नाले आणि गटारे पूर्णपणे स्वच्छ करण्यात येतील, जेणेकरून पावसाचे पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, मान्सूनपूर्व कामांना गती मिळाल्याने खेरवाडी परिसरातील स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पावसाळ्यात दरवर्षी उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येवर यंदा प्रभावी उपाय होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.
या मोहिमेमुळे परिसरातील स्वच्छतेतही सुधारणा होण्यास मदत होणार असून पावसाळ्यातील संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


